कोविडच्या वाढत्या रुग्णांची दखल घ्या, सुनील प्रभू यांनी मांडला प्रश्न

मुंबई आणि देशात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्लीच्या टास्क फोर्सनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्याचे कोविडबाबत नक्की धोरण काय, अशी विचारणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली. त्यावर राज्य सरकारने याची दखल घेण्याचे आदेश तालिका अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी  दिले

मुंबईसह देशात उद्या गुढीपाडव्याचा सण मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त मोठय़ा मिरवणुका निघतील; पण त्याच वेळेला कोविड डोके वर काढू लागला आहे. देशात एक हजाराहून अधिक रुग्ण सापडले. राज्यात 337 कोविड रुग्णांची नोंद झाली. टास्क फोर्सनेही वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोविडचे धोरण काय यावर आरोग्यमंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली. सुनील प्रभू यांच्या प्रश्नाची  दखल घेत तालिका अध्यक्षांनी याची दखल घेण्याचे आदेश सरकारला दिले.

पंतप्रधान आवास योजनेचे धोरण

सुनील प्रभू यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या धोरणावरही सरकारकडून स्पष्टीकरण मागितले. 2011च्या धोरणानुसार प्रत्येकाला वास्तव्याचा अधिकार मिळाला आहे. अशा लोकांना सशुल्क घर द्यावे अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे.  पंतप्रधान आवास योजनेतून किती रक्कम मिळणार, राज्य सरकारकडून किती रक्कम आणि झोपडपट्टीधारकाकडून किती रक्कम घ्यावी याचे धोरण अद्याप न ठरल्यामुळे अनेक झोपडपट्टीधारक  घरांपासून वंचित राहिले आहेत. माझ्या मतदारसंघात किमान 12  लोकांना अशी घरे मिळाली नाहीत. लोकांनी किती वर्षे हक्काच्या घरांपासून वंचित राहावे, असा सवालही सुनील प्रभू यांनी केला.