मूग डाळीपासून बनवा असे चविष्ट पदार्थ, बच्चेकंपनीही चाटून पुसून खातील

आपल्या स्वयंपाकघरातील मूगडाळ ही आरोग्यासाठी ही फार महत्त्वाची मानली जाते. परंतु मूगडाळीचे वरणाशिवाय अजून काय करु शकतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचे उत्तर तुम्हाला मिळेल. आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या मूग डाळीचा वापर करून नाश्त्यासाठी वेगवेगळ्या पाककृती बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. मूग डाळीमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन सी असते जे पचनक्रिया निरोगी ठेवते आणि शरीर निरोगी ठेवते. सुपरफूड मूग डाळ आपल्या आहारात वेगवेगळ्या प्रकारे कशी समाविष्ट करावी हे जाणून घेऊया.

 

मूग डाळीने बनवा या चविष्ट पाककृती

मूग डाळ चिल्ला

मूग डाळ चिल्ला बनवण्यासाठी, प्रथम मूग डाळ पाण्याने स्वछ धूवून घ्या आणि 3-4 तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर त्यामधले पाणी काढून टाका . नंतर मूग डाळ, आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या ब्लेंडरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर  डाळीची पेस्ट तयार झाल्यावर त्यामध्ये मीठ, कांदा आणि धणे घालून मिक्स करुन घ्या. नंतर तव्यावर थोडे तेल लावा आणि तयार केलेले मिश्रण ओता आणि दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजवून घ्या. तयार झालेला चिला चिंचेच्या चटणी किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

 

मूग दाल उत्तपम



मूग डाळ उत्तपम बनवण्यासाठी, मूग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ही डाळ किमान 4-5 तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर ब्लेंडरमध्ये आले, लसूण, मिरची आणि भिजवलेले मूग डाळ घालून वाटून घ्या. नंतर या पेस्टमध्ये मीठ घाला आणि त्यानंतर गॅसवर एक नॉन-स्टिक पॅन ठेवा, त्यात थोडे तेल घाला, थोडे तेल गरम झाल्यावर नंतर त्यामध्ये ही ब्लेंड केलेली  पेस्ट घाला आणि वर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चीज, धणे आणि हिरवी मिरची घाला आणि शिजवून घ्या काठावर थोडे तेल घाला आणि दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित शिजवून घ्या . तुमचा चविष्ट आणि निरोगी मूग दाल उत्तपम तयार आहे. गरमागरम सर्व्ह करा.

 

मूग डाळ भेळ



मूग डाळ भेळ बनवण्यासाठी, प्रथम मूग डाळ मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक करा, नंतर मूग डाळीत, मैदा,  मीठ, ओवा आणि तेल घाला. आता हे मिश्रण तीन भागांमध्ये विभागून घ्या. नंतर एका मिश्रणात बीटचा रस घाला आणि घट्ट पीठ मळून घ्या. नंतर दुसऱ्या मिश्रणात पालक प्युरी घाला आणि घट्ट पीठ मळून घ्या. तिसऱ्या भागात हळद पावडर आणि पाणी घालून पीठ मळून घ्या. या तीन पिठांपासून लहान पातळ पुरी बनवा. आता या पुऱ्र्या एका टार्ट मोल्ड किंवा बाऊलमध्ये ठेवा. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 20 मिनिटे बेक करा. भेळ बनवण्यासाठी, एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घाला आणि त्यात उकडलेली मूग डाळ घालून परतवून घ्या, नंतर ती एका भांड्यात ठेवा आणि त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, धणे, मिरची,  प्रीहीट केलेल्या पुऱ्या, चाट मसाला आणि लिंबाचा रस घाला आणि मूग डाळ घालून मिक्स करा. नंतर  मूगाची ही चटकदार भेळ सर्व्ह करा.