कवटीसारखा चेहरा दिसावा यासाठी कान कापून टाकले, नाकही कापण्याची तयारी

या जगात लोकांच्या डोक्यात काय खूळ भरेल याचा नेम नाही. जर्मनीतील फिनस्टरवाल्डमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला आपला चेहरा कवटीसारखा दिसावा असं वाटायला लागलं आहे. यासाठी त्याने आपले दोन्ही कान कापून टाकले आहेत. हे कान त्याने एका जारमध्ये भरून ठेवले आहे. सँड्रो असं या व्यक्तीचं नाव असून तो 39 वर्षांचा आहे. आपण फार चांगलं दिसू नये ही भावना मनात उत्पन्न झाल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे सँड्रोने म्हटलं आहे.

सँड्रोच्या अंगावर असंख्य टॅटू आहेत. त्याची सोशल मीडियावर मिस्टर स्कल फेस अशी ओळख निर्माण झाली आहे. बहुसंख्य लोकं त्याच्या या भयंकर निर्णयांबद्दल त्याला मनोरुग्ण म्हणतात. सँड्रोने आतापर्यंत 17 शस्त्रक्रिया स्वत:वर करून घेतल्या आहेत. या शस्त्रक्रियांद्वारे त्याने स्वत:ची कपाळपट्टी, हाताचा कोपरा आणि मनगटामधील भाग, डोक्याच्या मागचा भाग यामध्ये बदल करून घेतले आहे. त्याने स्वत:ची जीभही सापासारखी दोन तुकड्यांची करून घेतली आहे. 2019 साली सँड्रोनी शस्त्रक्रिया करून स्वत:चे कान कापून टाकले. त्याने आता स्वत:चे नाक कापून टाकण्याचे ठरवले आहे. त्यानंतर त्याने डोळ्यांच्या बुबुळ्ळांभोवती टॅटू काढण्याचंही ठरवलं आहे.

2007 साली टीव्ही बघत असताना सँड्रोला वाटायला लागलं की आपला चेहरा कवटीसारखा दिसावा, यासाठी त्याने स्वत:च्या शरिरात बदल करायला सुरुवात केली. बेरोजगार असलेल्या आणि एकटा जीव सदाशिव असलेल्या सँड्रोने स्वत:वर 17 शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. त्याचे घरचे आणि त्याला ओळखणारेही आता त्याला घाबरायला लागले आहेत. सँड्रोने 13 वर्षात चेहऱ्यावर असंख्य टॅटू गोंदवले असून कान कापल्यानंतर तो ओळखू येईनासा झाला आहे. लोकांच्या रागाबद्दल, भीतीबाबत विचारलं असता सँड्रो म्हणाला की मला त्याचा फरक पडत, मी कसा दिसतो यापेक्षा मी कसा आहे यावरून लोकांनी मला स्वीकारावे असे त्याचे म्हणणे आहे. माझ्या या रंगरुपामुळे मला कोणी नोकरी द्यायला तयार नाही, लोकं संकुचित विचाराचे असल्याचं सँड्रोचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या