आश्चर्य ! ‘बॉडी मॉडिफिकेशन’च्या नावाखाली नवरा-बायकोने जोपासला अनोखा छंद, दोघांचीही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

जगात काही लोकं अशी असतात, ज्यांचा परमेश्वरापेक्षा स्वत:च्या प्रयत्नांवर जास्त विश्वास असतो. यामुळेच देवाने दिलेल्या शरीरावर स्वत:च्या मनाने बदल करतात. हा बदल इतका वेगळा असतो की, अशा लोकांना ओळखणेसुद्धा कठीण होते. काही जणांना असं काहीतरी वेगळं करण्याचं वेड असतं. हा छंद, आवड किंवा क्रेझही असू शकते. ‘बॉडी मॉडिफिकेशन’च्या नावाखाली एका जोडप्याने स्वत:च्या शरीरावर अशाच पद्धतीने बदल केला. हा बदल इतका वैशिष्ट्यपूर्ण होता की, यामुळे त्यांची ओळखच बदलून गेली.

अर्जेंटिना येथे राहणारे गॅब्रिएला पेराल्टा आणि व्हिक्टर ह्यूगो पेराल्टा असे या विवाहित जोडप्याचे नाव आहे. या जोडप्याला टॅटू आणि बॉडी मॉडिफिकेशन इतके आवडते की, त्यांनी या दोन्हीच्या मदतीने त्यांनी स्व:च्या शरीराचा 98 टक्के भाग टॅटूने भरला आहे. या जोडप्याने त्यांचा हा अनोखा छंद इतका जोपासला की, त्या दोघांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले.

त्यांच्या आगळ्यावेगळ्या छंदाविषयी बोलताना गॅब्रिएला पेराल्टा आणि व्हिक्टर ह्यूगो पेराल्टा या जोडप्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने मुलाखत घेतली. त्यावेळी व्हिक्टर ह्यूगो पेराल्टा म्हणाले, ‘तुमच्या जीवनाचा आनंद घ्या. कलेचा आनंद घ्या. टॅटू तुम्हाला चांगली किंवा वाईट व्यक्ती बनवत नाही. ही फक्त एक कला आहे. काही लोकांना या कलेचे कौतुक वाटते, तर काही लोकांना ही कला अजिबातच आवडत नाही.’