तात्या राऊत

208

>> प्रभाकर पाणसरे

तसे पाहिले तर दिवंगत हिराजी रामचंद्र राऊत तथा तात्या यांच्या घराण्याचा फार मोठा इतिहास आहे. याच घराण्याच्या प्रेरणेतून विखुरलेला सोमवंशी क्षत्रिय समाज एकत्र आला. तो इतिहास फार मजेशीर आहे.

या घराण्याशी महाराष्ट्राचे लोकनेते तसेच सोमवंशी क्षत्रिय समाजाचे लोकप्रिय प्रणेते गोविंदराव धर्माजी तथा अण्णासाहेब वर्तक यांचे बंधुभावी जीवाभावाचे संबंध. या घराण्याला समाज शिवा राऊतांचे घराणे म्हणून ओळखत होता. वसई तालुक्यातील इतर समाज आपापल्या कुटुंबातल्या न्यायनिवाड्यासाठी त्यांचा सल्ला घेत असे. वसई, मांडलई, होळी नाक्यावर राऊतवाडीत त्यांचे घर. त्या घराची मुहूर्तमेढ १८८३ साली रोवली गेली. आज त्या घराला १३० वर्षे पूर्ण झाली आहेत. हे घर म्हणजे वास्तुशास्त्राचा एक अप्रतिम असा नमुना आहे. या घराला सोमवंशी क्षत्रियच नाही तर सारा समाजबांधव ‘ऐतिहासिक मोठे घर’ म्हणून मानतात. १९२० सालापर्यंत सोमवंशी क्षत्रिय समाज मुंबई, वसई, पालघर, डहाणू, ठाणे वगैरे ठिकाणी विखुरला होता. समाजबांधव आपापल्या गावी आपापला व्यवसाय, उद्योगधंदा मनोभावे आनंदित मनाने करीत होते. हा विखुरलेला समाज एका झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न यावेळचे सुविद्य समाजधुरीण करीत होते.

वसई तालुक्यातून लोकनेते अण्णासाहेब वर्तक, श्रीमंत भायजी जगू राऊत, समाजसेवक भास्कर हरी पाटील, मुंबईतून आत्माराम लक्ष्मण चौधरी, पालघर तालुक्यातील बळवंत जगन्नाथ वर्तक, हरिभाऊ पांडुरंग सावे, आत्माराम विठ्ठल सावे, मदनराव लक्ष्मण राऊत वगैरेंचा (माझ्या माहितीप्रमाणे) सहभाग फार मोठा होता. या सार्‍या समाजधुरिणांनी एकत्र येऊन सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ स्थापन करण्यासाठी १९२० साली पहिली सभा श्रीमंत भायजी जगू राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेतली होती. त्याच सभेत पहिली शाखा वसई, मांडलई येथे स्थापण्यात घेऊन पुढे मुंबई, पालघर, डहाणू, ठाणे येथील गावोगावी संघाच्या शाखा स्थापण्यात आल्या. तो काळ स्वातंत्र्यापूर्वीचा होता. स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत महात्मा गांधीजींच्या संदेशाबरहुकूम स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे जवान वसईतसुद्धा होते. त्या चळवळीत वसई देवाळे येथील स्वातंत्र्य सैनिक भास्कर नाना यांच्यासमवेत हिराजी तात्यांनी आपल्यापरीने त्यांना सहकार्य केले होते. शाळेचे पाठ गिरवीत देशधर्म त्यांनी पाळला होता. त्याच काळात लोकनेते अण्णासाहेब वर्तक यांनी सोमवंशी क्षत्रिय समाजास एक वेगळा संदेश दिला. ते गावोगावी जाऊन समाजबंधूंना संदेश देताना म्हणत असत, ‘‘माझ्या समाजबंधूंनो, आपापला पूर्वापार चालत आलेला शेतीवाडीचा व्यवसाय चालू ठेवा. यात खंड पडू देऊ नका. पण त्याचबरोबर शाळेत मिळणारे प्रचलित शिक्षणदेखील घ्या. शिक्षणाला कमी लेखू नका. शिक्षण हा ज्ञानाचा तिसरा डोळा आहे. तुम्ही शिक्षण घ्या आणि शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या समाजाचा झेंडा उंच उंच नेऊन फडकवा. पांढरपेशा समाजासमवेत वाटचाल करा.’’ अण्णासाहेब वर्तकांचा हा मौलिक विचार समाजबंधूंनी शिरसावंद्य मानून शैक्षणिक दिशेने ते वाटचाल करू लागले.

हिराजी रामचंद्र तथा तात्यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर नावाजलेल्या ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ या कंपनीत नोकरी स्वीकारली. त्यांचे काम पाहून कंपनीने त्यांची मोठ्या जबाबदारीच्या जागेवर नेमणूक केली. तात्या त्यांच्यावर पडलेली जबाबदारी कर्तव्यभावनेतून पार करीत असत. तात्यांकडे दूरदर्शीपणा आणि सामाजिक वृत्ती उपजतच होती. निवृत्त झाल्यावरही तात्यांनी सामाजिक बांधिलकी सोडली नव्हती. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक त्यांना उजवे हात मानावयचे आणि लोकनेते अण्णासाहेब वर्तक यांनी तात्यांना जीवनभर आदर्श मानले. सूर्या नदी प्रकल्पासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. ग्रंथ हेच त्यांनी आपले जीवन मानले. ते आदर्श शिक्षकदेखील होते.

आपली प्रतिक्रिया द्या