गाईने ढेकर दिली तर कर द्यावा लागणार

वातावरण बदलाविरोधातील लढ्यासाठी तोडगा म्हणून न्यूझीलंडमधील सरकारने गायींच्या ढेकरेवर कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. गोमूत्र आणि ढेकर या दोन्हीवर कर लावण्यात येणार असून या निर्णयावर पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी टीका केली आहे. शेतकरी जी जनावरे पाळतात त्यातील काही जनावरे पृथ्वीच्या तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरणारा गॅस उत्सर्जित करत असतात. गायीच्या ढेकरेतून मिथेन उत्सर्जित होतो तर मूत्रातून नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जित होत असतो.

गायींच्या ढेकरेवर कर लावल्यास हरितवायू उत्सर्जन कमी होईल मात्र न्यूझीलंडमधून पशुपालन आणि शेतीचे प्रमाण कमी होईल अशी भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. हे शेतकरी अन्न उत्पादनात पिछाडीवर असलेल्या इतर देशात जातील अशी भीती तिथल्या कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. न्यूझीलंडमधील कृषी क्षेत्र हे तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तिथले दुग्धजन्य पदार्थ हे मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जातात आणि त्यातून मोठं उत्पन्न न्यूझीलंडला मिळत असतं. न्यूझीलंडची लोकसंख्या ही 50 लाख असून पशुधन मात्र 3.6 कोटी इतकं आहे.

न्यूझीलंड सरकारने पशुंमुळे होणारे मिथेन वायूचे उत्सर्जन 2050 पर्यंत 47 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवले आहे. याअंतर्गत त्यांनी गायींच्या ढेकरेवर कर लावण्याचं ठरवलं असून 2025 पासून हा कर अंमलात येणार आहे. हा कर किती असेल हे अजून ठरलेलं नाहीये. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्देर्न यांनी म्हटलंय की या करातून आलेला पैसा हा पुन्हा कृषी क्षेत्रातच गुंतवला जाणार आहे. या पैशातून नव्या तंत्रज्ञानासाठी आणि संशोधनासाठी निधी उभारला जाणार आहे.