टीसी होणार टॅबमॅन!

सामना प्रतिनिधी । मुंबई

रेल्वेच्या तिकिटांसाठी उडणारी झुंबड आणि हातात पडणारे पार १०० ते ३०० पर्यंतचे ‘वेटिंग लिस्ट’चे तिकीट पाहून प्रवाशांना धडकीच भरते. परंतु आता रेल्वेने कात टाकण्याचा निर्णय घेतला असून रेल्वे प्रवासात डिजिटल क्रांतीच घडणार आहे. रेल्वेच्या टीसींना आता मोबाईल टॅब देण्यात येणार असून त्यासाठी खास मोबाईल ऑप्लिकेशनच विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेचे टीसी एकप्रकारे ‘टॅबमॅन’ बनणार असून रेल्वेच्या रिकाम्या जाणाऱया सीटस्ची माहिती वेळीच कळून वेटिंग लिस्टमधील प्रवाशांचे तिकीट कन्फर्म होण्यास मदत होणार आहे.

तिकीट तपासनीसांच्या पारंपरिक कार्यपद्धतीत आता आमूलाग्र बदल होणार आहे. ‘क्रिस’च्या प्रवासी आरक्षण केंद्राने रेल्वेच्या टीसींना देण्यात येणाऱया टॅबसाठी खास मोबाईल ऍप विकसित केले आहे. तसेच मध्य रेल्वेच्या हेडक्वॉर्टरमध्ये सॅमसंग कंपनीच्या टॅबवर टीसींचे प्रशिक्षणदेखील सुरू करण्यात आले आहे.

टीसींची आता कॅशलेस दंड आकारणी
टीसींना हॅण्डहेल्ड टर्मिनल मशीन देण्याच्या योजनेवर अभ्यास सुरू आहे. तसेच टीसींना ‘पीओएस’ मशीनदेखील देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांकडून डेबिट किंवा क्रेटिड कार्डाद्वारे दंडाची आकारणी करणे शक्य होणार आहे.

प्रवाशांना होणार फायदा
रेल्वे प्रवासात बऱयाचदा प्रवासी काही कारणाने येत नसल्याने बऱयाचदा सीटस् रिकाम्या राहतात. त्यामुळे ‘नेक्स्ट रिमोट लोकेशन’ला अशा रिकाम्या सीटस्च्या जागा लागलीच ट्रान्सफर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वेटिंगलिस्टवाल्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म होऊन त्यांना फायदा होणार आहे.