टीडीसी बँकेची ऑफर, २८ कोटी भरून ४८ कोटींचे कर्ज माफ करून घ्या

35
प्रातिनिधिक छायाचित्र

ठाणे, पालघरातील शेतकऱ्यांना ऑफर, ३ हजार २२५ जणांना मिळणार लाभ

सामना प्रतिनिधी । ठाणे

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत टीडीसी बँकेने आतापर्यंत २९ हजार ५५५ शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मात्र अजूनही तीन हजार २२५ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यांनी दीड लाखापेक्षा जास्त कर्ज घेतल्याने तांत्रिक बाबींमुळे त्यांचे कर्ज माफ होऊ शकले नाही. या शेतकऱयांनी २८ कोटींची थकबाकी भरल्यास त्यांना ४८ कोटींचे कर्ज माफ करण्यात येईल, अशी ऑफर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिली आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत या ऑफरचा लाभ ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

शेतकऱयांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी यासाठी शिवसेनेने टीडीसी बँकेबाहेर ढोल बजाओ आंदोलन केले होते. शिवसेनेने राज्यभर हे आंदोलन छेडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्जमाफी जाहीर करावी लागली. मात्र अजूनही ठाणे व रायगड जिह्यातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकलेला नाही. कारण कर्जमाफीची मर्यादा फक्त दीड लाख रुपयांपर्यंतच आहेत. मात्र ठाणे जिल्ह्यातील एक हजार ७३७ व पालघर जिह्यातील एक हजार ४४८ शेतकऱयांनी दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतले असल्याने त्यांचे कर्ज अद्यापि माफ होऊ शकले नाही. थकबाकीची एकूण रक्कम २८ कोटी ५८ लाख १३ हजार ९०२ रुपये एवढी आहे. दीड लाखावरील रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यास त्यांचे कर्ज माफ करण्यात येईल, अशी माहिती टीडीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर आदी उपस्थित होते.

सोसायट्या, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्सना सौरऊर्जेसाठी कर्ज
ठाणे व पालघर जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायट्या, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स आदींना सौरऊर्जा प्रणाली बसवायची असल्यास त्यासाठी कर्ज देण्याचा निर्णय टीडीसी बँकेने घेतला आहे. त्यासाठी साडेअकरा टक्के व्याज आकारले जाईल. त्याशिवाय रिक्षा विकत घेण्यासाठीदेखील तरुण बेरोजगारांना ११ टक्के व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या