चंद्राबाबू नायडू यांनी घेतली राहुल गांधींची भेट; आज विविध नेत्यांना भेटणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार काल थंडावल्यानंतर आता विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आणि भाजपविरोधातील महाआघाडीची ताकद वाढवण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी सकाळी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. 23 मे रोजी होणाऱ्या निवडणूक निकालानंतरच्या परिस्थितीबाबत आणि आगामी रणनीतीबाबत विविध पक्षनेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येत आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली असून ते बसपा अध्यक्ष मायावती आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांना भेटण्यासाठी लखनऊला जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारही चंद्राबाबूंना भेटणार आहेत. तसेच पवार युपिए अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत.

निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाआघाडीचे सरकार बनवण्यासाठी चर्चा बैठका सुरू झाल्या आहेत. त्यासाठी भाजपविरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी चंद्राबाबू नायडू आणि के. चंद्रशेखर राव विविध पक्षनेत्यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत. चंद्राबाबू नायडू शनिवारी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर ते लखनऊला जाऊन मायावती आणि अखिलेश यादव यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही चंद्राबाबूंना भेटणार आहेत. चंद्राबाबू यांनी शुक्रवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. या भेटीत डाव्या पक्षांच्या मदतीने महाआघाडीच्या सरकारस्थापनेबाबत चर्चा करण्यात आली. चंद्राबाबू यांना युपिए अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घ्यायची होती.मात्र, त्यांची भेट झाली नाही.

चंद्राबाबू नायडू यांच्याप्रमाणेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर रावही भाजपविरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करत आहेत. राव यांनी गेल्या आठवड्यात केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी डीएमके नेते एम. के. स्टॅलीन यांची भेट घेतली होती. निवडणुकींच्या निकालांपूर्वीच महाआघाडीतील नेत्यांच्या भेटी-गाठी आणि चर्चा- बैठका सुरू झाल्या असून निवडणूक निकालानंतरच्या परिस्थितीबाबत आणि महाआघाडीच्या सरकारस्थापनेबाबत चर्चा होत आहेत.