भाजपमध्ये इनकमिंग सुरुच, टीडीपीच्या मुख्य प्रवक्त्यासह दोन खासदारांचा प्रक्षप्रवेश

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तेलुगू देसम पक्षाला आणखी एक धक्का बसला असून त्यांच्या मुख्य प्रवक्त्यांनी आणि पक्षाच्या औद्योगिक विभागाचे सचिव यांनी पक्षाला रामराम केला आहे. टीडीपीचे मुख्य प्रवक्ते लंका दिनाकर आणि औद्योगिक विभागाचे सचिव कोनेरू वेंटकाकृष्ण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.

टीडीपीच्या चार राज्यसभा खासदारांनी गेल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये चंद्राबाबू नायडू यांचे खास असणाऱ्या दोन ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश होता. यानंतर आता मुख्य प्रवक्त्यांनी पक्ष सोडल्याने टीडीपीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यापुढील आव्हान वाढले आहेत.

टीडीपी ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अंबिका कृष्णा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. अंबिका कृष्णा एलुरू येथून आमदार म्हणून निवडून आले होते. ते चित्रपट निर्मात देखील आहेत. अंबिका कृष्णा यांच्यासह बुधवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार एपी अब्दुल्लाकुट्टी यांनी आणि राष्ट्रीय लोक दलाचे राज्यसभा खासदार राजकुमार कश्यप यांनी देखील भाजपमध्य प्रवेश केला.