मोदी लाटेत जिंकून जनतेला फसविणाऱ्यांचा सूड घ्या! – संजय राऊत

16

सामना प्रतिनिधी । पुणे

२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेत निवडून आलेल्या भाजपच्या आमदार-खासदारांनी जनतेची फसवणूक केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भगव्या झेंड्यांचाही अपमान केला आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीमध्ये त्यांचा सूड घ्या असा जबरदस्त घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या भगव्याखाली एकत्र येऊन २०१९ मध्ये राज्यात शिवसेनेचा भगवा फडकवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे आणि नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या विकासनिधीतून होणाऱ्या १८ कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, शहरप्रमुख महादेक बाबर, पालिकेतील शिकसेनेचे गटनेते संजय भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

लाटेत निवडून आलेल्या आमदार-खासदारांची कामे दिसून येत नाहीत. ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे थापा मारतात. हडपसर मतदारसंघातील स्थानिक आमदार म्हणतात की, मतदारसंघात १ हजार ८०० कोटींची विकासकामे केली. खोटे बोलण्यासाठी जर शिक्षा होत असती तर पहिली शिक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरी शिक्षा येथील स्थानिक आमदाराला झाली असती. पंतप्रधान मोदी यांनी तर दावोसमध्ये जाऊनही थाप मारली. हिंदुस्थानातील सहाशे कोटी नागरिकांनी भाजपला मते देऊन विजयी केले आहे असे मोदी यांनी सांगितले. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात ६०० कोटी मते कोठून आणली, अशी टीकाही खासदार राऊत यांनी केली.

दरम्यान, सध्याचे सरकार केवळ योजनांची घोषणा करीत आहे, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कामे करीत नाही. याचा फटका सर्वसामान्य नागरिकाला बसत असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या