शाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक

72

सामना प्रतिनिधी । अलिबाग

शाळकरी विद्यार्थींनीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला फलाणी ग्रामस्‍थांनी येथेच्‍छ बदडून पोलिसांच्‍या हवाली केले. पोलिसांनी त्‍याच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तर या शिक्षकाला राजीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी या घटनेनंतर निलंबित केले आहे.

नित्‍यानंद धोंडू पाटील असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे. तो माणगाव तालुक्‍यातील फलाणी येथील प्राथमिक शाळेवर कार्यरत होता. शाळेतील दोन मुलींशी तो अश्‍लील चाळे करीत होता. गेल्‍या 7 ते 8 महिन्‍यांपासून हा प्रकार सुरू होता. शाळेत अलीकडेच नव्‍याने रूजू झालेल्‍या शिक्षिकेला या विद्यार्थिनींनी हा प्रकार सांगितला. त्यांनी याबाबत पालकांना व ग्रामस्थांना कळविल्यानंतर ग्रामस्थांनी नित्यानंद पाटील आणि त्यांच्या शिक्षिका पत्नीला फलाणी येथे बोलावून घेतले. दम देताच नित्यानंद पाटील याने आपल्या विकृतीची कबुली देऊन आपण हे कृत्य केल्याचे मान्य केले. त्यानंतर ग्रामस्थांनी या शिक्षकाला चोप देवून गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. गोरेगाव पोलिसांनी नित्यानंद पाटील विरोधात भा.द.विं. कलम 376 (एच एफ ) पोस्को (बाल लैंगिक अत्‍याचार संरक्षण कायदा ) तसेच अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा 1989 चे कलम 3 (1) ( 11 ) अन्वये गुन्‍हा दाखल केला असून त्‍याला अटक करण्यात आली आहे.

या दुर्दैवी घटनेने पालकवर्गात संतापाचे वातावरण आहे. ज्या विश्वासाने पालक आपल्या मुलांना शाळेत शिक्षकाच्या ताब्यात सोपवतात तेच शिक्षक विद्यार्थ्याचे लैगिक शोषण करून शिक्षणासारखे क्षेत्र बदनाम करीत आहेत. शिक्षकच शालेय विद्यार्थ्यानींचे लैंगिक शोषण करीत असतील तर पालकांनी दाद मागायची तरी कुणाकडे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या