आधारकार्डासाठी शिक्षकाची बेदम मारहाण,शस्त्रक्रियेमुळे विद्यार्थ्याचा पाय वाचला

45

सामना ऑनलाईन, पिंपरी

आधारकार्डाच्या ‘सक्तीमुळे’ झारखंडमध्ये एका ११ वर्षांच्या मुलीचा भूकबळी गेल्याची घटना ताजी असतानाच आधारच्या अतिरेकाची आणखी एक घटना पिंपरीत उघडकीस आली आहे. वारंवार सांगूनही आधार कार्ड न आणल्याने एका पातवीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बदम मारहाण केली. या विद्यार्थ्याच्या डाव्या पायावर लाकडी पट्टीने मारल्याने त्याला अंतर्गत दुखापत झाली होती. या प्रकाराबद्दल खरात नावाच्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हा प्रकार चिंचवडगाव-श्रीधरनगरातील एम.एस.एस. (माटे) शाळेतला आहे.  सरकारच्या विविध योजनांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची नोंद करणे शिक्षकांना बंधनकारक आहे. श्रीशांत मल्लिकार्जुन बेळळे (वय – १०, रा. दत्तात्रय कॉलनी, वाल्हेकरवाडी रस्ता,चिंचवडगाव) यालाही आधारकार्ड क्रमांक आणण्याची सूचना खरात यांनी केली होती. वेळोवेळी सांगूनही आधारकार्ड क्रमांक आणला नाही म्हणून खरात संतापले होते या संतापाच्या भरात त्यांनी श्रीशांतला ही मारहाण केली. हा प्रकार सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस घडला असून या मारहाणीमुळे श्रीशांतच्या पायाला अंतर्गत दुखापत झाली होती. यानंतर संसर्ग होऊन त्याच्या गुडघ्यामध्ये पाणी झालं. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागली होती. दहा दिवस तो चिंचवडगावातील चैतन्य हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. प्रकृती स्थिर झाल्यावर श्रीशांतच्या पालकांनी पोलिसांत धाव घेऊन शिक्षकाविरोधात तक्रार दिली. शाळेला दिवाळी सुट्टया असल्याने शिक्षकाला अटक करण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या