Video – शाळा पुन्हा सुरू झाल्याच्या आनंदात शिक्षिकेने विद्यार्थ्यांसमोर केला बेली डान्स

रशियातील खबरोवस्क भागातील शाळा उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा सुरू झाल्या आहेत. आपल्या मुलांना सोडण्यासाठी जेव्हा त्यांचे पालक शाळेत गेले होते, तेव्हा तिथलं दृश्य पाहून ते हादरले होते. विद्यार्थी आणि पालकांचं स्वागत करण्यासाठी नृत्य आणि संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये एका शिक्षिकेने चक्क बेली डान्स करून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. सात वर्षे वय असलेल्या विद्यार्थ्यांसमोर ही शिक्षिका नाचत असल्याचे पाहून त्यांच्या पालकांना काय बोलावं हे सुचतच नव्हतं.

या घटनेनंतर तिथल्या शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. हा प्रकार चुकीचा असल्याचं शिक्षण विभागाने म्हटल्याचं तिथल्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीत म्हटलंय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ही शिक्षिका अत्यंत उत्तान्न कपड्यांमधअये बेली डान्स करताना दिसते आहे.

या सगळ्या प्रकाराला शाळा प्रशासन जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेबाबत बोलताना काही पालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे असले प्रकार मुलांनी पाहावेत यासाठी आम्ही ‘फी’वर खर्च करतो का असा प्रश्न एका पालकाने विचारला आहे. सुट्टीनंतर पुन्हा शाळा सुरू होण्याचा दिवस हा तिथे ‘नॉलेज डे’ म्हणून साजरा केला जातो. यावेळी विद्यार्थ्यांना फुलं दिलं जातात, नवीन गणवेश दिले जातात आणि त्यांचं शाळेत स्वागत केलं जातं. हे सगळं बाजूला ठेवत तिथे बेली डान्स का ठेवण्यात आला याचं उत्तर अनेक पालकांना सापडत नाहीये. लहान मुलांना तिथे काय सुरू होतं, हे कळत नव्हतं आणि पालक हे अवघडलेल्या अवस्थेत हा प्रकार पाहात होते.

आपली प्रतिक्रिया द्या