उशीरा फी भरल्याने शिक्षिकेने चिमुरडीचे केस कापले

27

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यामधील एका खासगी शाळेतील शिक्षिकेने फी भरण्यास उशीर झाल्याने एक सात वर्षीय विद्यार्थीनीचे केस कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्राची गुप्ता असे या निरागस विद्यार्थीनीचे नाव असून ती येथील ज्ञानोद्य विद्या मंदिर शाळेत शिकते. नियमित वेळेवर फी भरणा-या प्राचीने या महिन्यात फी भरली नसल्याने संतप्त शिक्षिकेने हे कृत्य केले. दरम्यान, संबंधित शिक्षिकेवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शाळा प्रशासनाने दिले आहेत.

प्राचीच्या घरची परिस्थिती बेताची असून तीच्या वडिलांचा फोटोग्राफिचा व्यवसाय आहे. पण या महिन्यात पैशांची तंगी असल्याने वेळेत प्राचीची तीन हजार रुपये फी भरणे त्यांना शक्य झाले नाही. पण वर्गशिक्षिकेने प्राचीच्या मागे फी भरण्याचा तगादा लावला होता. लहानग्या प्राचीला शिक्षिकेला काय उत्तर द्यायचे ते कळत नसल्याने ती गप्प बसून शिक्षिकेची बोलणी खात होती.

घरी पैशांची अडचण असल्याने तीने शिक्षिकेच्या जाचाबददलही कोणालाही सांगितले नाही. दरम्यान इतके बोलूनही प्राचीचे पालक फी भरत नसल्याने चिडलेल्या शिक्षिकेने भरवर्गात प्राचीचे केस कापले. संपूर्ण वर्गासमोर झालेला अपमान सहन न झाल्याने दुखावलेल्या प्राचीने जेवण सोडून दिले. कोणाशीही ती बोलत नव्हती. मुलीच्या वागण्यातला फरक बघून वडिलांनी तिला त्याबददल खोदून खोदून विचारले. त्यानंतर प्राचीने झालेल्या घटनेची माहिती घरातल्यांना दिली. फी न भरल्यामुळे लेकीला झालेली शिक्षा बघून घरातले हादरले. त्यानंतर तिच्या वडिलांनी थेट शाळा गाठत मुख्याध्यापकांना झालेला वृत्तांत सांगितला. त्यानंतर मुख्याध्यपकांनी त्या शिक्षिकेला बोलावून कडक शब्दात समज दिली व तिच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन प्राचीच्या वडिलांना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या