लग्नानंतर चौथ्या महिन्यात बाळंत झाली, शिक्षिकेला नोकरीवरून काढून टाकले

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, कोट्टाकल

लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यानंतर एक शिक्षिका बाळंत झाली. हे कळाल्याने शाळा प्रशासनाने या शिक्षिकेला बाळंतपणासाठीच्या रजेनंतर शाळेत प्रवेश देण्यास नकार दिला आणि तिला शाळेतून काढून टाकलं. केरळमधील कोट्टाकल जिल्ह्यातील हा प्रकार आहे. आपल्याला शिक्षक-पालक संघटनेच्या बैठकीत शिवीगाळही करण्यात आल्याचं या शिक्षिकेचं म्हणणं आहे. या शिक्षिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून बुधवारी तिचे म्हणणे पोलिसांनी सविस्तर पध्दतीने नोंदवून घेतले.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त दिले असून त्यात म्हटले आहे की ही महिला पाच वर्ष या शिक्षिकेचे काम करते. शिक्षिकेचा घटस्फोट झाला असून तिने दुसरे लग्न केले आहे. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच ती ज्याच्यासोबत दुसरं लग्न करणार होती त्याच्यासोबत राहात होती. 2018 साली तिने रितसर पद्धतीने दुसरे लग्न केलं आणि नंतर बाळंतपणासाठी रजा घेतली. रजेच्या दुसऱ्या दिवशीच तिला मुलगी झाली. लग्न झाल्याच्या चौथ्या महिन्यानंतर तिने बाळाला जन्म दिला होता. बाळंतपणाची रजा झाल्यानंतर ही महिला जानेवारी 2019 मध्ये शाळेत पुन्हा रुजू होण्यासाठी गेली. यावेळी शाळा प्रशासनाने तिला पुन्हा रुजू करून घेण्यास नकार दिला.

या महिलेने पूर्वी महिला आणि बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. केरळमधील आयोगाने शिक्षण विभागाच्या संचालकांकडून महिलेविरोधातील कारवाईबाबत स्पष्टीकरण मागवले होते. आयोगाने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर महिलेला पुन्हा शाळेत रुजू करून घ्यावे असा आदेश दिला होता. हा आदेश शाळा प्रशासनाने मानण्यास नकार दिला आहे. यामुळे पोलीसच आता चौकशी करून या प्रकरणी आपल्याला दिलासा देऊ शकतील असा विश्वास या महिलेला वाटतोय.

आपली प्रतिक्रिया द्या