दहावीतील विद्यार्थीनीचा मृत्यू, शिक्षकानेच विष आणून दिल्याचे उघड

2278

सोमवारी शिरोळ तालुक्यातील एका दहावीतील विद्यार्थीनीचा अन्ननलिकेत संसर्ग झाल्याने मृत्यू झाला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. शाळेतील शिक्षकानेच तिला किटकनाशक दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. निलेश (रा. भैरेवाडी कुरुंदवाड) असे या शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सुजाता (नाव बदलले आहे) ही शिरटी हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती. 20 फेब्रुवारी रोजी हायस्कूलमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा होती. प्रात्यक्षिकानंतर दुपारी प्रयोगशाळेतून वर्गात आलेल्या सुजाताने आपल्या दप्तरातील बाटलीतून पाणी प्यायले. यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ती घरी गेली. तिथे प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला प्रथम शिरोळ व नंतर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, अन्ननलिकेत संसर्ग झाल्याने सोमवारी मध्यरात्री तिचा मृत्यू झाला होता.

यानंतर मंगळवारी सकाळी संतप्त नातेवाईकांनी सुजाताचा मृतदेह तब्बल चार तास तिच्या शाळेसमोर ठेवला. सुजाताचा मृत्यू संशयास्पद असून तिच्या पाण्याच्या बाटलीत विष आले कोठून याची सखोल चौकशी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली होती. सुजाताच्या वडिलांनी शिरोळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्यादही दिली होती.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात शिक्षक निलेश यानेच सुजाताचा घात केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी संशयित शिक्षक प्रधाने यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपण सुजाता हिला कुरुंदवाड येथील एका औषध दुकानातून विषारी औषध आणून दिल्याची कबुली दिली आहे. परंतु शिक्षकाने सुजाता हिला विषारी औषध का आणून दिले, याचा उलगडा झालेला नव्हता. पोलिसांनी विषाची बाटली जप्त केली असून संबंधित दुकानदाराकडून औषध खरेदीचे बिल ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. निलेशने सुजाताला विषाची बाटली का आणून दिली, तसेच त्यांच्यात काही वाद होते का याची पोलीस चौकशी करत आहेत. या चौकशीनंतरच सुजाताच्या मृत्युचे खरे कारण स्पष्ट होईल.

आपली प्रतिक्रिया द्या