भयंकर! चौथीच्या दोन विद्यार्थिनींवर चार दिवस शिक्षकाने केला बलात्कार

सामना ऑनलाईन । रायगंज

कठुआ, उन्नाव व गुजरात येथील सामूहिक बलात्कार व हत्येच्या घटनांनी देशभरात खळबळ उडालेली असतानाच पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर येथे सरकारी शाळेत एका शिक्षकाने (३५) चौथीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींवर सलग चार दिवस बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या नराधम शिक्षकाने शाळा सुटल्यावर या दोन्ही विद्यार्थिनींवर वर्गातच लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर या घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी त्याने या दोघींना दिली होती. दरम्यान आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या घटने नंतर या दोघींपैकी एकीने शाळेत जाण्यास नकार दिला. यामुळे तिच्या पालकांना संशय आला व त्यांनी तिला विश्वासात घेऊन याबद्दल विचारले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या दरम्यान मुलीने असाच प्रकार दुसऱ्या वर्गमैत्रिणीबरोबरही झाल्याचे पालकांना सांगितले. नंतर पालकांनी दुसऱ्या मुलीच्या घरी जाऊन याबद्दल तिच्याजवळ विचारणा केली असता तिनेही या घटनेस दुजोरा दिला. गेल्या चार दिवसांपासून शिक्षक रोज शाळा सुटल्यावर आम्हा दोघींना वर्गात डांबून ठेवतात. त्यानंतर आमच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे व याबद्दल कोणास सांगितले तर जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे दोघींनी पालकांना सांगितले.

यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी रायगंज पोलीस ठाण्यास याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दोन्ही पीडित मुलींची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली असून त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याचे कळताच शिक्षक फरार झाला असून पोलीस त्याची कसून शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या