एकाच वेळी 25 शाळांमध्ये शिक्षिका! 13 महिन्यांत झाली कोट्यधीश

3843
प्रातिनिधीक फोटो

उत्तर प्रदेशमध्ये एका खळबळजनक घोटाळ्याचा खुलासा झाला आहे. एक शिक्षिका गेल्या वर्षभर एकाच वेळी 25 शाळांमध्ये शिकवत असल्याचं उघड झालं आहे. या 13 महिन्यांचा तिच्या पगाराचा आकडा एक कोटीच्या घरात गेला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अनामिका शुक्ला असं या शिक्षिकेचं नाव आहे. ही शिक्षिका उत्तर प्रदेशातील कस्तुरबा गांधी विद्यालयात विज्ञान शिकवते. रायबरेलीचे शिक्षण अधिकारी आनंद प्रकाश यांना या प्रकाराची कुणकुण लागली आणि त्यांनी सर्व शिक्षा अभियानांतर्गत सहा जिल्ह्यांना पत्र पाठवलं. त्यात अनामिका शुक्ला नावाची शिक्षिका तुमच्या शाळेत काम करते का, असं विचारण्यात आलं होतं. तिचे तपशीलही मागवण्यात आले होते. या यादीमध्ये प्रयागराज, आंबेडकर नगर, अलीगढ, सहारनपूर, बागपत येथील कस्तुरबा गांधी विद्यालय या नावाच्या शाळांचा समावेश होता.

या पत्राला जेव्हा उत्तर आलं, तेव्हा सगळा विभाग हडबडला. कारण, या जिल्ह्यांमध्ये असलेल्या 25 कस्तुरबा गांधी विद्यालयांमध्ये तिचं पोस्टिंग कंत्राटी तत्वावर झाल्याचं उघड झालं होती. अशा शिक्षकांना महिना तीस हजार रुपये इतकं वेतन मिळतं. ते वेतन ती गेल्या 13 महिन्यांपासून घेत होती. विशेष म्हणजे, या वेतनांसाठी तिने एकच बँक अकाउंट वापरलं होतं. अनामिका शुक्ला ही ज्या शाळांमध्ये शिक्षिका म्हणून नियुक्त आहे, तिथे ती वर्षभरापासून काम करत होती. त्यासाठी जी हजेरी नोंदवावी लागते, ती प्रेरणा पोर्टल नावाच्या वेबसाईटवरून ऑनलाईन तत्वावर केली जाते. हजेरीवेळी वेगवेगळ्या संगणकांचे आयपी अॅड्रेसही आपोआप नोंद होता. असं असूनही ती एकाच वेळी इतक्या ठिकाणाहून हजेरी कशी लावत होती, याचं कोडं आता शिक्षण विभागाला पडलं आहे.

सध्या या शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं आहे. तिच्या बँकेच्या अकाउंटसह तिने दाखल केलेल्या कागदपत्रांचीही पडताळणी केली जात आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास झाल्याशिवाय निश्चित काही सांगता येणार नसल्याचं शिक्षण विभागाने सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या