विद्यार्थिनींना अश्लील मेसेज, टिप्पणी करण्याऱ्या शिक्षकाविरोधात पालकांची तक्रार

नवी दिल्लीच्या बॉईज लॉकर रूम प्रकरणाचे पडसाद उमटत असताना अशाच प्रकारचं प्रकरण नवी मुंबईत घडलं आहे. विद्यार्थिनींवर अश्लील टिप्पणी करणे आणि त्यांना अश्लील मेसेज करणे या कारणांवरून एका शिक्षकाविरोधात पालकांनी तक्रार केली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नवी मुंबई येथील एका शाळेतील शिक्षकावर विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. गेली पाच वर्षं तो विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विद्यार्थिनींच्या कपड्यांवर आणि अंतर्वस्त्रांवर अश्लील टिप्पणी करणं, अश्लील इशारे करणं अशी कृत्य हा शिक्षक करत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. यात शाळेच्या माजी आणि आजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आरोप करणाऱ्यांमध्ये काही विद्यार्थी देखील असून त्यांनीही या शिक्षकाने लैंगिक छळ केल्याचं म्हटलं आहे.

या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. इन्स्टाग्रामवर शिक्षकाने केलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉटही पालकांनी शेअर केले आहेत. या आरोपांचं शिक्षकाने खंडन केलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थिनींशी तो चुकीचा वागला असेल तर त्याच वेळी त्यांनी तक्रार का केली नाही. इतक्या दिवसांनी तक्रार का केली, असं शिक्षकाचं म्हणणं आहे. शाळा प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू केली आहे, तसेच शिक्षक या प्रकारात दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असं शाळा प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या