
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी नाट्यमय हालचाली पाहायला मिळाल्या. काँग्रेसने उमेदवारी देऊनही ऐनवेळी सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुधीर तांबे यांनी म्हटले की, “सत्यजीत तांबे हे उत्तम दृष्टीकोण असलेले नेतृत्व असून, त्यांना विविध विषयांचे सखोल ज्ञान आहे त्यामुळे असं एक नवे नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं ज्यामुळे आम्ही महाविकास आघाडीकडून सत्यजीत तांबे यांचा अर्ज भरला आहे.”
अर्ज भरल्यानंतर प्रतिक्रिया देताना सत्यजीत तांबे यांनी म्हटले की “आम्ही मागणी केली होती आणि काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांची इच्छा होती की यंदा मला उमेदवारी देण्यात यावी. काँग्रेसने मात्र निर्णय घेताना डॉ.सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. काही तांत्रिक अडचणींमुळे मला शेवटच्या क्षणी मला फॉर्म भरावा लागला. एक अपक्ष म्हणून भरला आहे तर एक काँग्रेसतर्फे भरला आहे. पण माझ्या नावाचा एबी फॉर्म येऊ न शकल्याने मला आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागेल. परंतु मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. मी काँग्रेसच्या विचारावर आजपर्यंत काम केलं आहे. हे खरं असलं तरी मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटणार आहे आणि त्यांना मी विनंती करणार आहे की राजकीय सीमांच्या पलिकडे जाऊन सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभे रहावे.”
महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार नाशिक पदवीधर विधान परिषदेची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेसने या निवडणुकीत पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन वेळेस विजयी झाले आहेत. आज सकाळीदेखील सुधीर तांबे हेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी स्पष्ट चिन्हं होती. बुधवारी, सुधीर तांबे यांनी निवडणूक अर्ज भरण्यास जाणार असल्याचे ट्वीटही केले होते.