शिक्षकांच्या कामाची दर आठवडय़ाला ‘शाळा’

प्रातिनिधीक फोटो

बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेणाऱया शिक्षकांची आता दर आठवडय़ाला शाळा भरणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आठवडाभर केलेल्या प्रयत्नांचा अहवाल तयार करून आठवडय़ाच्या शेवटी तो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (एमएससीईआरटी) सादर करायचा आहे.

राज्यातील बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा, शिक्षक करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती केंद्र सरकार तसेच इतर राज्यांसोबत होणाऱया बैठकीत सादर करण्याच्या दृष्टीने एमएससीईआरटीने ही माहीती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, माध्यमाच्या बारावीपर्यंतच्या शिक्षकांकडून हा अहवाल मिळणे अपेक्षित असल्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दर आठवडय़ाच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी शिक्षकांनी आपला अहवाल सादर करायचा आहे.

या कामाची नोंद करावी लागणार
– विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देणे
– फोनच्या माध्यमातून कम्युनिटी क्लासेस चालविणे
– शिक्षक-मित्र तयार करणे
– शाळेमध्ये राबविले जाणार इतर उपक्रम
– किती विद्यार्थ्यांपर्यंत संपर्क साधला, किती तास अभ्यास झाला, शिक्षणाचे माध्यम कोणते याची माहिती द्यावी लागणार

अशी करा नोंद
– शिक्षकांनी http://coid19.scertmaha.ac.in या लिंकवर माहिती भरायची आहे.
– त्यासाठी लिंकवर रजिस्ट्रेशन करणे आकश्यक आहे.
-रजिस्ट्रेशन झाल्यास दर आठवडय़ाला शिक्षकांना आपल्या मोबाईलवर पासवर्ड मिळणार आहे.
– या पासवर्ड च्या आधारे लिंक ओपन करून दर आठवडय़ाला अहवाल सादर करायचा आहे.

शिक्षकांमध्ये नाराजी
एमएससीईआरटीने दिलेल्या या सूचनांमुळे शिक्षक वर्गात नाराजी पसरली आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे आधीच कामाचा व्याप वाढला आहे. त्यातच कोरोनाची टांगती तलवार ही डोक्यावर आहे. त्यात भर म्हणून आणखी एका अशैक्षणिक कामाचा बोजा शिक्षकांच्या खांद्यावर टाकल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या