मातृभाषेचा मानदंड महत्त्वाचा

57

प्रा. वैजनाथ महाजन

मराठी राजभाषा जरूर आहे, पण तिला ज्ञानभाषा म्हणून मान्यता व तसा दर्जा प्राप्त होण्याकरिता सर्वच शिक्षकांनी कसून प्रयत्न करणे अगत्याचे आहे आणि राज्याच्या शिक्षण खात्याने असे भाषिक पर्यावरण निर्माण होण्याकरिता प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे वाटते. असे असले तरी समृध्द भाषा काही शासन निर्माण करू शकत नाही, तर ती शिक्षकांनीच निर्माण करायची आहे आणि त्याचा आनंद विद्यार्थ्यांना द्यावयाचा आहे याचा संबंधितांना विसर पडू नये.

महाराष्ट्राच्या उपराजधानीत म्हणजेच नागपूर येथे नुकतीच एक महत्त्वाची शिक्षण परिषद झाली. याला ‘शिक्षक संमेलन’ असेही संबोधण्यात आल्याचे दिसते. यावेळी महाराष्ट्रातील थोर विचारवंत  सदानंद मोरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपदावरून त्यांनी केलेले भाषण सर्वच शिक्षकांना अंतर्मुख करणारे आणि भविष्यातील शिक्षणाची जाणीव करून देणारे असेच होते असे दिसून आले. यावेळी ते असे म्हणाले की, शिक्षक हा अनेक पिढय़ांमध्ये दुवा म्हणून काम करत असतो. त्याकरिता त्याचे माध्यम म्हणजे भाषा असते. शिक्षकांचा विषय कोणताही असला तरी त्याची मातृभाषा अव्वल दर्जाची असल्याशिवाय तो आपल्या विद्यार्थ्यांत आत्मविश्वासाने वावरू शकत नाही. कारण त्याची संपूर्ण अभिव्यक्ती ही भाषिक असते. याकरिता प्रत्येक शिक्षकाचा भाषेच्या काटेकोर वापरावर भर असला पाहिजे. आपल्या तोंडी जर निसरडी भाषा असेल तर अशी भाषा विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेऊ शकत नाही.  असा त्यांच्या एकूण प्रतिपादनाचा मथितार्थ होता. या प्रतिपादनात नवे काही नाही असे अनेक शिक्षक बांधवांना वाटण्याची शक्यता आहे, पण तसे नाही. कारण आपल्याकडे शालेय स्तरावर मातृभाषेची प्रचंड हेळसांड होत असल्याचे आता सार्वत्रिक चित्र निर्माण झालेले आहे. त्याची काही कारणेही आहेत. बरेचसे शिक्षक मातृभाषा हा विषय कितपत गांभीर्याने घेतात हे समजण्यास काही मार्ग नाही. याकरिता शासकीय स्तरावर त्यांच्या कार्यशाळाही आयोजित केल्या जात असतात. तसेच विविध उपक्रमही राबविले जात असतात, पण हे सारे किती अर्थपूर्णरीत्या होत असते हेही आता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे असे वाटते.

शिक्षणशास्त्र्ााच्या पदव्यांमध्ये याची कितपत सोय आहे हेही नीटपणे उमजत नाही आणि आपल्याकडे मराठी भाषा ही मराठी साहित्याच्या वळणाने शिकविण्याची पध्दत रुढ झाली असल्याने अभ्यास फार फार तर साधकबाधकरीत्या साहित्याचा होत असावा, भाषेचा नाही हेही आता स्पष्ट झालेले आहे. भाषाशास्त्र्ााकडे कोणाचा फारसा कल असत नाही. त्यामुळे एका पिढीकडून समृध्द भाषा येणाऱ्या पिढीकडे जाण्याकरिता अडचणी निर्माण होत आहेत हेही आता स्पष्ट झाले आहे. त्यातून इंग्रजी माध्यमाचे प्राबल्य वाढत असल्याने ना मराठी, ना इंग्रजी अशी एक विचित्र अवस्था विद्यार्थी  जगतात दिसून येत आहे. त्यामुळे केवळ काही वर्षांनी नव्हे तर अवघ्या पाच वर्षांनी आजची मुले उद्या कोणती भाषा बोलतील हे सांगणेही कठीण झाले आहे आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांतील मौखिक संवाद हरवण्यात होऊ लागला आहे. दुसरी एक बाब या ठिकाणी नमूद करणे अगत्याचे वाटते आहे, गेल्या काही वर्षांत नव्याने शिक्षक झालेले असंख्य तरुण शिक्षकमित्र बोलीभाषेतच मातृभाषा शिकवीत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक आकलनात अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत आहेत. नित्याच्या व्यवहारात बोलण्याकरिता बोलीभाषा ठीक आहे. तिचा वापरही आपणास आनंद देणारा असतो याबद्दलही दुमत असण्याचे कारण नाही, पण ज्यावेळी आपण भाषा शिकवितो, तेव्हा प्रमाण भाषा समोर असण्याला पर्याय असत नाही. कारण जर बोलीभाषेत शिकविले गेले तर विद्यार्थी उत्तरपत्रिका लिहिताना बोलीभाषा वापरतात व यामुळे ते प्रमाण भाषेपासून दूर जातात असे दिसते. खरे तर मातृभाषा हा आपल्या सर्व ज्ञानव्यवहाराचा पाया असतो. ती जर पुरेशा गांभीर्याने शिकविली गेली नाही तर विद्यार्थी अनेक ज्ञान संधीपासून वंचित राहू शकतो. हे केवळ आपल्या इथे आहे असे नाही तर हे आज सर्व प्रांतांतील चित्र आहे. याकरिता शिक्षकांचा शिक्षण व्यवहारातील सहभाग भाषिक अंगाने सतत वाढत गेला पाहिजे, त्याकरिता त्यांना तशा संधी पण प्राप्त होणे अगत्याचे आहे. शिक्षकांची संमेलने अशा विचारांनी भरून जाणे गरजेचे आहेच. त्याकरिता त्यांना तशी भाषिक ग्रंथसंपदाही उपलब्ध होणे गरजेचे आहे. असे जर घडून आले नाही तर भविष्यात अनेक अनर्थ निर्माण होणार, हे सांगण्यास कुणा ज्योतिष्याची गरज नाही. महाराष्ट्रात आज भाषा वैज्ञानिकांची वानवा आहे. त्याला कारणसुध्दा असेच काहीसे आहे. व्याकरणाकडे आपण कधीच पुरेशा गांभीर्याने पाहिले नाही. उलटपक्षी तो विषय आपण ऐच्छिक बनविला. या साऱयाचे एकत्रित परिणाम आता समाजाच्या भूपृष्ठावर येऊ लागले आहेत आणि ते जाणवू लागले आहेत. खरे तर शिक्षकाचा विषय कोणताही असो, पण तो त्याच्या समृध्द भाषेनेच खुलून विद्यार्थ्यांसमोर येणार असतो. त्याकरिता भाषा शिक्षकांची आणि एकूणच सर्व शिक्षकांची जबाबदारी वाढते असे वाटते. नागपूरच्या त्या शिक्षक संमेलनातील अध्यक्षीय चिंतन केवळ उपस्थित शिक्षकांपुरतेच मर्यादित नव्हते, तर ते महाराष्ट्रातील तमाम साऱया शिक्षक बांधवांसाठी होते हे आपण लक्षात घेतले की, या दिशेने आपण विचारही करायला लागू असे वाटते. अमृतातील पैजा जिंकणारी ही माय मराठी समृध्द करायची असेल, तिची भरभराट करावयाची असेल, तर आता सर्वच मराठी भाषा शिक्षकांनी अग्रेसर राहणे अगत्याचे आहे. त्याकरिता आपला माथा उन्नत असला पाहिजे, माझी भाषिक अभिव्यक्ती मला समाधान देणारी असली पाहिजे असाच प्रत्येक शिक्षकाचा आग्रह निर्माण होणे अगत्याचे आहे. त्याशिवाय आपण आपल्या मातृभाषेचे पाईक आहोत, हे महाराष्ट्राला कसे काय उमजणार! मराठी राजभाषा जरूर आहे, पण तिला ज्ञानभाषा म्हणून मान्यता व तसा दर्जा प्राप्त होण्याकरिता सर्वच शिक्षकांनी कसून प्रयत्न करणे अगत्याचे आहे आणि राज्याच्या शिक्षण खात्याने असे भाषिक पर्यावरण निर्माण होण्याकरिता प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे वाटते. असे असले तरी समृध्द भाषा काही शासन निर्माण करू शकत नाही, तर ती शिक्षकांनीच निर्माण करायची आहे आणि त्याचा आनंद विद्यार्थ्यांना द्यावयाचा आहे याचा संबंधितांना विसर पडू नये.

आपली प्रतिक्रिया द्या