दिव्यांग शाळेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग, सामाजिक न्यायमंत्र्यांची माहिती

राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना दोन महिन्यांच्या आत सातवा वेतन आयोग लागू करणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी विधान परिषदेत दिली. दिव्यांग शाळेतील कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत डॉ. सुधीर तांबे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

शिक्षकांना देण्यात येणारे समकक्ष वाढीव अनुदान, भत्ते यांसह अन्य प्रश्नी उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य विभागांसमवेत बैठक घेऊन सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भातील सर्व अडसर दूर करून दोन महिन्यांच्या आत हा वेतन आयोग लागू करण्यात येईल.

दिव्यांग शाळेतील शिक्षकांना अन्य शिक्षकांच्या तुलनेत मिळणारे 100 रुपये वाढीव अनुदान व त्यातील समकक्ष दुवे यातील फरक स्पष्ट करत हे अडसर दूर व्हावेत व दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना अन्य विभागांतील कर्मचाऱयांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन मिळावे यासाठी अर्थ व नियोजन खात्यासह संबंधित विभागांसोबत बैठक घेणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी सांगितले. सरकार दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष ज्युनियर कॉलेज उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या