विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज!

13

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा रनमशीन विराट कोहलीने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर जगभरातील गोलंदाजांवर दहशत निर्माण केली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्येही कोहली आपल्या खेळीने हिंदुस्थानला विजय मिळवून देत आहे. केपटाऊनमध्ये कोहलीने नाबाद १६० धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. कोहलीच्या याच दणकेबाज खेळावर पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार मियाँदादनं एका पाकिस्तानी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत विराटचे कौतुक केले आहे. ‘ कोहली सातत्याने धावा करत आहे. कोहलीची तंत्रशुद्ध फलंदाजी आणि कठीण परिस्थितीतही हिंदुस्थानला विजय मिळवून देण्याची त्याच्यात असलेली क्षमता बघता, तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे,’ असे मियाँदाद म्हणाले.

दक्षिण आफ्रिकेमध्ये विराट कोहलीने सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यात ११२, दुसऱ्या सामन्यात नाबाद ४६ आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद १६० धावांची खेळी करत हिंदुस्थानला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. या विजयामुळे हिंदुस्थानचा संघ एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या