टी-20 वर्ल्ड कपआधीच टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू; लक्ष्मण, कुंबळे शर्यतीत

यूएई व ओमान येथे 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकपदाचा शोध सुरू झाला आहे. रवी शास्त्राr व सपोर्ट स्टाफ टी-20 वर्ल्ड कपनंतर आपापल्या पदावर कायम राहणार नाहीत. त्यामुळे या स्पर्धेनंतर हिंदुस्थानला नवीन प्रशिक्षक स्टाफ मिळणार हे निश्चित आहे. अनिल कुंबळे व व्हीव्हीएस लक्ष्मण हे हिंदुस्थानचे माजी खेळाडू मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असून गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी पारस म्हांब्रेच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे.

या आठवडय़ात जाहिरात निघणार

रवी शास्त्री यांच्यासोबत गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचाही करार नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात येत आहे. बीसीसीआयकडून नव्या प्रशिक्षकासह सपोर्ट स्टाफचाशी शोध सुरू आहे. त्यामुळे या आठवडय़ातच बीसीसीआयकडून सपोर्ट स्टाफच्या पदासाठी जाहिरात काढण्यात येणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धची मालिका नव्या प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफसह

हिंदुस्थानचा संघ 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. त्यानंतर 17 नोव्हेंबरपासून हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामध्ये मायदेशात मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेत नवे प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ दिसणार आहेत. हिंदुस्थानचा संघ डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वपूर्ण दौऱयावर जाणार आहे. त्याआधीच ड्रेसिंग रूममध्ये प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ यांचा खेळाडूंसह योग्य समन्वय साधला जावा यासाठी बीसीसीआयकडून लवकरात लवकर ही निवड प्रकिया पूर्ण करण्यात येणार आहे.

प्रशिक्षकपदासाठी दिग्गज खेळाडू रेसमध्ये

बीसीसीआयच्या सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले की, अनिल कुंबळे व व्हीव्हीएस लक्ष्मण या मोठय़ा नावांची प्रशिक्षकपदासाठी चर्चा सुरू असली ही फक्त पहिली पायरी आहे. आणखी काही दिग्गज खेळाडू या पदासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. तसेच पारस म्हांब्रे याने जर गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला तर हिंदुस्थानी संघासाठी हे नक्कीच लाभदायक असणार आहे. पण अशा परिस्थितीत अंडर-19 संघासाठीचा प्रशिक्षक आम्हाला शोधावा लागणार आहे, असेही त्यांच्याकडून पुढे स्पष्ट करण्यात आले. पारस म्हांब्रे हा सध्या राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीचा गोलंदाजी प्रशिक्षक असून अंडर-19 संघालाही त्याचे मार्गदर्शन लाभत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या