कोहली ब्रिगेडने लंकेत नोंदवले १६ विक्रम

53

सामना ऑनलाईन । कोलंबो

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने श्रीलंकेला कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही हरवले. हा पराक्रम करणाऱ्या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी श्रीलंका दौऱ्याच्या निमित्ताने तब्बल १६ विक्रम केले आहेत.

 • पहिला विक्रम – पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १५ बळी घेणारा एकमेव गोलंदाज होण्याचा मान हिंदुस्थानच्या जसप्रीत बुमराह या गोलंदाजाला मिळाला आहे. याआधी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १४ बळी घेण्याची कामगिरी २०१० साली पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या क्लिंट मॅकाय याने केली होती.
 • दुसरा विक्रम – तब्बल ३ वेळा पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला पुरते नामोहरम करुन निर्भेळ यश मिळवणारा (व्हाईट वॉश) कर्णधार होण्याचा मान विराट कोहलीने पटकावला आहे.
 • तिसरा विक्रम – पाहुण्या संघाने ३ कसोटी सामन्यांची मालिका पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका अशा दोन्हीत निर्भेळ यश (व्हाईट वॉश) मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. हिंदुस्थाने यजमान लंकेला पूर्णपणे चीतपट केले आहे.
 • चौथा विक्रम – श्रीलंकेला त्यांच्या घरात व्हाईट वॉश देणारा हिंदुस्थान हा पहिलाच संघ.
 • पाचवा विक्रम – मनगटाच्या जोरावर चेंडू फिरवणारे दोन फिरकी गोलंदाज एकाच एकदिवसीय सामन्यात हिंदुस्थानकडून पहिल्यांदाच खेळवण्यात आले. हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात ही घटना ९२२व्या एकदिवसीय सामन्याच्या निमित्ताने झाली. या सामन्यात हिंदुस्थानकडून कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे गोलंदाज खेळले.
 • सहावा विक्रम- जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या दोन्ही खेळाडूंनी या मालिकेत एका सामन्यात ५ बळी घेण्याची कामगिरी केली. दोन हिंदुस्थानी गोलंदाजांनी एकाच मालिकेत सामन्यात ५ बळी घेण्याची कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
 • सातवा विक्रम- आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या खेळाडूंपैकी सर्वाधिक अर्धशतकी खेळी करणारा विराट कोहली हा तिसरा फलंदाज ठरला. कोहलीच्या पुढे एबी डिव्हीलियर्स (७७),महेंद्रसिंह धोनी (७५) हे खेळाडू आहेत. कोहलीने आतापर्यंत ७४ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे.
 • आठवा विक्रम- २०१७ या वर्षात विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यात ४ शतकं झळकावली आहेत.
 • नववा विक्रम- एका कॅलेंडर वर्षात १००० हून अधिक धावा करण्याची विराट कोहलीची ही पाचवी वेळ आहे.
 • दहावा विक्रम- कोलंबोतल्या अखेरच्या एकदविसीय सामन्यात भुवनेश्वर कुमारने ५ बळी घेतले. ५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी मिळवण्याची भुवनेश्वर कुमारची ही पहिलीच वेळ ठरली. या मालिकेत ३ सामने खेळूनही भुवनेश्वरला एकही विकेट मिळवता आली नव्हती. मात्र ही कमतरता त्याने अखेरच्या सामन्यात भरून काढली.
 • अकरावा विक्रम- लागोपाठ डावांमध्ये शतक झळकावण्याची विराट कोहलीची ही पाचवी वेळ. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सने हा विक्रम अनेकवेळा केला आहे.
 • बारावा विक्रम- पाच किंवा त्यापेक्षा जास्त वन-डे सामन्यांच्या मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला व्हाईट वॉश देण्याची ही हिंदुस्थानची ही सहावी वेळ आहे. कोहलीने ही किमया ३ वेळा, धोनीने २ वेळा तर गौतम गंभीरने एकदा साधलेली आहे.
 • तेरावा विक्रम- श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीचं हे आठवं शतक ठरलं. यासोबत विराटने सचिनच्या (८ शतकं) श्रीलंकेविरुद्ध झळकावलेल्या शतकांशी बरोबरी केली. एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम अजूनही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. (ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ शतकं)
 • चौदावा विक्रम- वन-डे कारकिर्दीतलं विराट कोहलीचं हे तिसावं शतक ठरलं. या शतकासोबत विराट कोहलीने रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली.
 • पंधरावा विक्रम- वन-डे सामन्यांमध्ये सर्वाधिक यष्टीचीत बळींचा संगकाराच्या नावावर असलेला विक्रम महेंद्रसिंह धोनीने कोलंबोच्या मैदानात मोडला. अकिला धनंजयाला यष्टीचीत करून धोनीने १०० यष्टीचीत बळींचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. संगकाराच्या नावे ९९ बळी आहेत.
 • सोळावा विक्रम- विराट कोहलीने १८६ डावांमध्ये ३० शतकं झळकावली आहेत. सर्वात कमी डावांमध्ये विराट कोहलीने हा विक्रम केला आहे. याआधी सचिन तेंडुलकरने २६७ डावांमध्ये तर रिकी पाँटिंगने ३४९ डावांमध्ये ३० शतकं झळकावली होती.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या