क्रिकेटपटूंच्या घरात कोरोनाचा शिरकाव, चेतन साकारियाच्या पाठोपाठ पीयूष चावलाच्या वडिलांचे निधन

टीम इंडियाचा फिरकीपटू पीयूष चावला याचे वडील प्रमोद चावला यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यापासून 10 दिवस रुग्णालयात उपचार घेत होते. प्रमोद चावला यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. पीयूष चावला याने इंस्टाग्रामवरून वडिलांच्या निधनाची माहिती दिली.

कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रमोद चावला यांना मुरादाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येत खालावल्याने त्यांना दिल्ली येथील रूग्णालयात शिफ्ट करण्यात आले, पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही.

पीयुष चावला याने इंस्टाग्रामवर टाकलेल्या पोस्ट मध्ये लिहिले की, ‘आज आपल्यामागे पाठीशी उभा राहणारा मजबूत स्तंभ ढासळला आहे. आता त्यांच्याशिवायचे जीवन हे पहिल्या सारखे नसणार.’ गेल्या काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सचा युवा गोलंदाज चेतन साकारिया याच्या वडिलांचे निधन कोरोना संसर्गामुळे झाले होते.

पीयुष चावलाच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच मुंबई इंडियन्सच्या संघाने ट्विट करत त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचाइजीने ट्वीट केलो की, ‘आम्ही ह्या कठीण प्रसंगी आपल्या कुटुंबासोबत आहोत, तुम्ही खंबीर रहा.’

पीयूष चावलाने इंस्टाग्रामवर वडिलांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करताना लिहिले की, ‘आज मी आपली मोठी ताकद गमावली आहे.’ पीयूष चावला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळतो.

आपली प्रतिक्रिया द्या