हिंदुस्थानचा ‘बोल्ड’चा विक्रम

सामना ऑनलाईन । रांची

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात रांचीमध्ये झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात हिंदुस्थानने अनोखा विक्रम केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या हिंदुस्थानने पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव १८.४ षटकांत ८ बाद ११८ धावांवर रोखला. त्यानंतर डकवर्थ ल्युईसच्या नियमानुसार ६ षटकांत ४८ धावांचे आव्हन पार करत हिंदुस्थानने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या डावातील वैशिष्ट्य म्हणजे ऑस्ट्रेलियाचे ८ पैकी ६ फलंदाज बोल्ड झाले. फक्त ग्लेन मॅक्सवेल (कॅच आऊट) आणि डॅनियल ख्रिस्तियन (रन आऊट) दोन फलंदाज बोल्ड झाले नाहीत.

या विक्रमाची सुरुवात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या विकेटने झाली. भुवनेश्वर कुमारच्या एका अप्रतिम बॉलवर वॉर्नर ८ धावांवर बोल्ड झाला. त्यांनंतर अॅरोन फिंच (४२), मोजिज हेनरीक्स (८), ट्रॅव्हिस हेड (९), टीम पेन (१७) आणि नॅशन कुल्टर-नाईल (०१) धावांवर बोल्ड झाले. टी-२० क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकाच डावात ६ फलंदाज बोल्ड होण्याची ही पाचवी वेळ आहे.