‘टीम इंडिया’ अंतिम फेरी गाठण्यासाठी उत्सुक

14

सामना ऑनलाईन । कोलंबो

सलामीच्या लढतीतील पराभवानंतर ‘टीम इंडिया’ने लागोपाठ दोन लढती जिंकून निदहास चषक तिरंगी टी-२० क्रिकेट स्पर्धेत जोरदार मुसंडी मारली. आता रोहित शर्माच्या शिलेदारांची पुन्हा एकदा बांगलादेश संघाशी गाठ पडणार आहे. ही लढत जिंकून आधीच मालिकेची अंतिम फेरी गाठून निश्चिंत होण्यासाठी ‘टीम इंडिया’ उत्सुक आहे. बांगलादेशविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले, तर अंतिम फेरी गाठण्यासाठी हिंदुस्थानी संघाला उगाच जर-तरच्या समीकरणावर अवलंबून रहावे लागेल.

सलामीच्या लढतीत हिंदुस्थानला श्रीलंकेकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. मात्र त्यानंतर बांगलादेश व श्रीलंकेला हरवून हिंदुस्थानने लागोपाठ दोन विजय मिळविले. मात्र बांगलादेशने मागील लढतीत श्रीलंकेकडून मिळालेले २१५ धावांचे लक्ष्यही सहज पूर्ण केले होते. त्यामुळे मनोबल उंचावलेल्या बांगलादेशकडून ‘टीम इंडिया’वर पलटवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कागदावर बांगलादेशचा संघ श्रीलंकेपेक्षा नक्कीच सरस असल्यामुळे हिंदुस्थानला गाफील राहून चालणार नाही. याचबरोबर कर्णधार रोहित शर्मावर रुसलेली बॅट, सुरेश रैनाला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात येत असलेले अपयश ही ‘टीम इंडिया’साठी चिंतेची बाब ठरत आहे. मागील सामन्यात हिंदुस्थानने बांगलादेशला १३९ धावांवर रोखले होते. मात्र तमीम इक्बाल, लिटन दास व मुशफिकर रहीम यांनी श्रीलंकन गोलंदाजांना तुडविले होते. त्यामुळे हिंदुस्थानी गोलंदाजांना उद्या टिच्चून मारा करावा लागेल. जयदेव उनाडकट तिन्ही लढतींत महागडा गोलंदाज ठरलाय. शार्दुल ठाकूरने दोन सामन्यांत चांगली गोलंदाजी केली, तर वाशिंग्टन सुंदरनेही चांगला मारा केला आहे. या त्रिकुटावर उद्याच्या लढतीचे बरेच भवितव्य अवलंबून असेल.

उभय संघ

हिंदुस्थान : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, दीपक हुड्डा, वाशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, रिषभ पंत.

बांगलादेश : महमुदुल्लाह (कर्णधार), तमीम इक्बाल, सौम्या सरकार, इमरूल कायेस, मुश्तफिकर रहीम, सब्बीर रहमान, मुस्तफिजूर रहमान, रुबेल हुसैन, तस्कीन अहमद, अबू हैदर, अबू जायेद, अरिफूल हक, नजमूल इस्लाम, नुरुल हसन, महदी हसन, लिटोन दास.

  •  हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार सामना सायं. ७ वाजता.
आपली प्रतिक्रिया द्या