टीम इंडिया मोठ्या संकटात, कर्णधार रोहित कोरोना पॉझिटिव्ह

टीम इंडियाचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. 1  ते 5 जुलै 2022 या कालावधीत मागच्या दौऱ्यातील रद्द झालेला इंग्लंडविरुद्धच्या पाचवा कसोटी क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे. या लढतीआधीच हिंदुस्थानी कर्णधार रोहित शर्मा कोरोनाग्रस्त झाला आहे. लिसेस्टरशायर संघाविरुद्धच्या सराव लढतीदरम्यान रोहितची कोरोना चाचणी घेण्यात आली. शनिवारी झालेल्या रॅपिड ऍण्टीजन चाचणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तो सध्या संघाच्याच हॉटेलमध्ये विलगीकरणामध्ये असून बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख ठेवत आहे. कोरोना  चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने टीम इंडियाचा कर्णधार कसोटी सामना खेळू शकेल की नाही याबाबत अनिश्चितता आहे. जर रोहित कसोटी सामना खेळला नाही तर ऋषभ पंत किंवा जसप्रीत बुमराह यांच्याकडे हिंदुस्थानी  संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली जाऊ शकते. याशिवाय चेतेश्वर पुजाराचाही पर्याय संघ व्यवस्थापनाकडे उपलब्ध आहे.

रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक कसोटीपूर्वी चारदिवसीय सराव सामन्यात लिसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळत होता. रोहितने गुरुवारी पहिल्या डावात फलंदाजी केली, पण शनिवारी हिंदुस्थानच्या  दुसऱया डावात तो फलंदाजीसाठी आला नाही. सराव सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 25 धावा केल्या होत्या.

 एजबस्टन कसोटीत सलामीला कोण?

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत हिंदुस्थान  2-1 ने आघाडीवर आहे. गेल्या वर्षी झालेली ही मालिका कोरोना महामारीमुळे  अर्धवट सोडावी लागली होती. याच मालिकेतील शेवटचा सामना आता खेळवला जाणार आहे. एजबस्टन येथे होणारा हा सामना निर्णायक असल्याने अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. या  सामन्यात जर कर्णधार रोहित खेळू शकला नाही तर शुभमन गिलसोबत सलामीला कोण येणार, हा मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे. कारण हिंदुस्थानचा अन्य सलामीवीर के. एल. राहुल अगोदर दुखापतीमुळे संघासोबत नाही.

देशभरातील क्रीडा चाहत्यांसाठी अविस्मरणीय क्षण असलेल्या हिंदुस्थानच्या 1983  क्रिकेट विश्वचषक जेतेपदाच्या आठवणी कायम राहण्याच्या दृष्टीने पेमेंट्झ या पेमेंट गेटवे प्लॅटफॉर्मसह ओपस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 1983  वर्ल्ड कप कॉफी टेबल बुकचे अनावरण शनिवारी मुंबईत झाले. यावेळी टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार कपिलदेव यांच्यासह माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आदी क्रिकेटपटूंसह पेमेंट्झ आणि ओपस इंडियाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.