इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी कोहली ब्रिगेडचा आपल्याच संघाशी होणार ‘सामना’

इंग्लंडचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात इंग्लंडचा संघ चार कसोटी, पाच टी-20 आणि तीन एक दिवसीय सामने खेळणार आहे. 5 फेब्रुवारीपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून चेन्नईमध्ये पहिला कसोटी सामना रंगणार आहे. घरच्या मैदानावर हिंदुस्थानचा संघ 2012 पासून अपराजित आहे, मात्र 2012 ला इंग्लंडच्याच संघाने टीम इंडियाचा मायदेशात पराभव केला होता. त्यामुळे ही मालिका रोमहर्षक होण्याची आशा क्रीडाप्रेमींना आहे.

इंग्लंडच्या हिंदुस्थान दौऱ्यानंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2021) च्या 14 व्या हंगामाला सुरुवात होईल. गेल्या वर्षी कोरोनामुळे आयपीएलचा हंगाम यूएईमध्ये खेळला गेला होता, मात्र यंदा घरच्याच मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. आयपीएल संपल्यानंतर हिंदुस्थानचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. जुलैमध्ये हिंदुस्थानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल आणि तेथील वातावरणात सराव व्हावा म्हणून कोहली ब्रिगेडला आपल्याच संघाशी सामना करावा लागणार आहे.

हिंदुस्थानला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सान्यांची मालिका खेळायची आहे. 4 ऑगस्टपासून नॉटिंघममध्ये पहिला कसोटी सामना सुरू होईल. मात्र तत्पूर्वी तेथील वातावरणात खेळण्याचा सराव व्हावा म्हणून कोहली ब्रिगेड नॉटिंघमशायरमध्ये टीम इंडियाच्याच ‘ए’ संघाशी भिडणार आहे. नॉटिंघमशायर क्रिकेट क्लबने याबाबत माहिती दिली आहे.

‘इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात करण्यापूर्वी विराट कोहलीचा संघ चार दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. हा सामना हिंदुस्थान-अ संघाशी होईल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काउंटी क्रिकेट मैदानावर जगातील काही महान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आपल्याला खेळताना दिसणार आहेत. ‘हिंदुस्थान’ आणि ‘हिंदुस्थान-अ’ संघाचे आम्ही त्यावेळी स्वागत करू’, असे नॉटिंघमशायर क्रिकेट क्लबने म्हटले आहे. यानंतर दुसरा सराव सामना लिसेस्टरशायर येथे 28 जुलैला खेळला जाणार आहे.

असा असेल दौरा

हिंदुस्थानला इंग्लंड दौऱ्यामध्ये पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. पहिला सामना 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट, दुसरा सामना 12 ते 16 ऑगस्ट, तिसरा सामना 25 ते 29 ऑगस्ट, चौथा सामना 2 ते 6 सप्टेंबर आणि पाचवा सामना 10 ते 14 सप्टेंबरदरम्यान रंगणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या