दीप्तीने नियमानुसारच कृती केलीय; ‘बार्मी आर्मी’ने नवे नियम वाचून टीका करावी!

क्रिकेटचे नियम बनवणारी आयसीसी तुम्हीच स्थापन केलीत. त्याच संघटनेने मांकडिंगच्या निर्णयाला कायदेशीर मान्यता दिलीय. हिंदुस्थानच्या दीप्ती शर्माने नियमानुसारच इंग्लंडच्या शार्लोट डीनला बाद केले. मग आता त्यासाठी अश्रू ढाळून टीका करण्यापेक्षा क्रिकेटचे नवे नियम वाचा. इंग्रजी समाजात नसेल तर आमची मदत घ्या, असे दमदार प्रत्युत्तर हिंदुस्थानी क्रिकेट चाहत्यांनी इंग्लंडच्या ‘बर्मी आर्मी’ ग्रुपला दिले आहे. दीप्तीने शेवटची विकेट ज्या पद्धतीने घेतली त्यावरून वादंग माजला आहे. मात्र हिंदुस्थानी कर्णधार हरमनप्रीत कौरसह हिंदुस्थानच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी दीप्तीची बाजू घेणारी ट्विट्स आणि संदेश सोशल मीडियावर टाकले आहेत.

महिला टीम इंडियाने सामना जिंकल्यानंतर बर्मी आर्मीने एक ट्विट केले की, दीप्तीने ज्या पद्धतीने इंग्लंडच्या खेळाडूला बाद केले ते नियमांना धरूनच आहे, पण तिने जे केले ते खरे क्रिकेट नाही. खेळ संपवण्याची ही एक चुकीची पद्धत आहे, हे अखिलाडूपणाचे वर्तन आहे. मात्र बर्मी आर्मीच्या या ट्विटला हिंदुस्थानी खेळाडू आणि चाहत्यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने तिसऱया वन डे सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव करत सीरिज 3-0 ने निर्विवाद जिंकली, मात्र हिंदुस्थानच्या विजयापेक्षा फिरकीपटू दीप्ती शर्माने इंग्लंडची खेळाडू चार्ली डीनला धावबाद केल्याचीच चर्चा जास्त होती. चेंडू टाकण्यापूर्वीच डीनने क्रीझ सोडली होती आणि या संधीचा फायदा घेत दीप्तीने तिला धावबाद केले. यानंतर या वादात क्रिकेट जगतात मात्र दोन भिन्न मतप्रवाह गट दिसून आलेत. एक गट दीप्तीला साथ देत आहे. तो म्हणतो, दीप्तीने जे काही केले ते तिने नियमानुसार केले. त्याच वेळी दुसरा गट मात्र हे खेळाच्या अगदी विरुद्ध असल्याचे सांगत आहे. दीप्तीने ज्या पद्धतीने डीनला रनआऊट केले त्या धावबादच्या क्रियेला ‘मांकडिंग’ असेही म्हणतात, मात्र अशा प्रकारे बाद झाल्यावर इंग्लंडची फलंदाज डीन मैदानातच रडली. अखेर सहकारी खेळाडूला तिची समजूत काढावी लागली.