टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोनाची लागण, ‘कसोटी चॅम्पियनशीप’साठी झालीय निवड

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी शुक्रवारी बीसीसीआयने हिंदुस्थानचा संघ जाहीर केला. यानंतर काही तासांतच एक निराशाजनक वृत्त आले. टीम इंडियामध्ये निवड झालेला वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna corona positive) याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी प्रसिद्ध कृष्णा याची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड झाली आहे. त्याच्यासह अभिमन्यू इश्वरन, आवेश खान आणि अरजान नागवासवाला यांचीही स्टँडबाय खेळाडू म्हणून या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये प्रसिद्ध पॉझिटिव्ह आढळला.

कोलकाताचा चौथा खेळाडू

दरम्यान, प्रसिद्ध कृष्णा इंडियन प्रीमिअर लीगच्या 14 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा सदस्य होता. कोरोनाची लागण होणारा प्रसिद्ध कोलकाताचा चौथा खेळाडू आहे. त्याच्या आधी वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि टीम सिफर्ट यांना कोरोनाची लागण झाली होती.

असा आहे इंग्लंड दौरा

टीम इंडियाचा संघ 2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला 18 ते 22 जून दरम्यान साउथहॅम्पटनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर इंग्लंडशी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना – 4 ते 8 ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरा सामना – 12 ते 16 ऑगस्ट, लॉर्डस
तिसरा सामना – 25 ते 29 ऑगस्ट, लीड्स
चौथा सामना – 2 ते 6 सप्टेंबर, ओव्हल
पाचवा सामना – 10 ते 14 सप्टेंबर, मॅनचेस्टर

आपली प्रतिक्रिया द्या