फलंदाजांचा पुन्हा फ्लॉप शो, टीम इंडियाची मदार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीवर

521

पहिल्या डावात सुमार कामगिरी करणाऱया हिंदुस्थानच्या फलंदाजांना दुसऱया डावातही निराशेचा सामना करावा लागलाय. पृथ्वी शॉ (14 धावा), चेतेश्वर पुजारा (11 धावा) व कर्णधार विराट कोहली (19 धावा) यांच्या फ्लॉप शोमुळे हिंदुस्थानची पहिल्या कसोटीच्या तिसऱया दिवसअखेरीस बिकट अवस्था होऊन बसलीय. उपकर्णधार अजिंक्य रहाणे 25 धावांवर, तर हनुमा विहारी 15 धावांवर खेळत आहे. टीम इंडियाने दुसऱया डावात 4 बाद 144 धावा केल्या असून अजूनही पाहुणा संघ 39 धावांनी पीछाडीवर आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात 348 धावा तडकावल्या. दुखापतीमधून बरा होत टीम इंडियात पुनरागमन करणाऱया इशांत शर्माने 68 धावा देत पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

– रहाणे, विहारीच्या कामगिरीवर लक्ष
हिंदुस्थानवर डावाने पराभवाचे संकट कोसळू शकते. अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी या दोन फलदाजांवर सर्व काही अवलंबून असणार आहे. तसेच तळाचे फलंदाज कशी कामगिरी करताहेत हे पाहणेही रंजक ठरणार आहे. उद्याचा कसोटीचा चौथा दिवस निर्णायक ठरेल यात शंका नाही.

– ग्रॅण्डहोम, जेमिसन, बोल्टने झुंजवले
न्यूझीलंडने रविवारी तिसऱया दिवशी 5 बाद 216 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने बीजे वॉटलिंगला 14 धावांवर बाद करीत यजमानांना पहिला धक्का दिला. पण त्यानंतर कोलिन डी ग्रॅण्डहोमने पाच चौकारांसह 43 धावांची, काईल जेमिसनने चार षटकार व एक चौकारासह 44 धावांची आणि ट्रेण्ट बोल्टने एक षटकार व पाच चौकारांसह 38 धावांची खेळी साकारत न्यूझीलंडला पहिल्या डावात 348 धावा उभारून दिल्या. इशांत शर्माने 68 धावा देत न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला. रविचंद्रन अश्विनने 99 धावा देत तीन फलंदाज बाद केले.

– पुन्हा निराशा
पृथ्वी शॉ व मयांक अग्रवाल या सलामी जोडीने हिंदुस्थानसाठी दुसऱया डावात 27 धावांची आश्वासक सुरुवात करून दिली. पण ट्रेण्ट बोल्टच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ 14 धावांवर टॉम लॅथमकरवी झेलबाद झाला आणि टीम इंडियाला पहिला धक्का बसला. त्यानंतर मयांक अग्रवाल व चेतेश्वर पुजारा ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच ट्रेण्ट बोल्टनेच चेतेश्वर पुजाराची दांडी गुल केली. चेतेश्वर पुजाराने 81 चेंडूंत फक्त 11 धावा केल्या. अतिबचावात्मक फलंदाजीने यावेळी घात केला. याच दरम्यान मयांक अग्रवालने एक षटकार व सात चौकारांसह 58 धावांची खेळी करीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण टीम साऊथीने त्याला बीजे वॉटलिंगकरवी झेलबाद करीत मोठा अडसर दूर केला. कर्णधार विराट कोहलीला या दौऱयात अद्याप सूर गवसलेला नाही. ट्रेण्ट बोल्टने त्याला 19 धावांवर बीजे वॉटलिंगकरवी झेलबाद करीत हिंदुस्थानचा पाय खोलात नेला.

आपली प्रतिक्रिया द्या