टीम इंडियासाठी खूषखबर, बुमराह वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता

jasprit-bumrah

टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषकात खेळणार नसल्याचे समोर आले होते. त्याच्या जागी बीसीसीआयने मोहम्मद सिराजला संघात घेतल्याचेही जाहीर केले. मात्र आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जसप्रीत बुमराह वर्ल्डकपमध्ये खेळू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे.

”बुमराह वर्ल्डकपमधून अद्याप बाहेर पडलेला नाही. याबाबत अंतिम निर्णय येत्या दोन तीन दिवसात घेण्यात येईल’, असे सौरव गांगुलीने कोलकाता येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

बुमराहला सावरण्यासाठी 4 ते 6 महिने लागणार

जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखण्यातून सावरण्यासाठी 4 ते 6 महिने लागतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी -20 सामन्यात तो टीम इंडियाचा भाग नव्हता. बंगळुरूमध्ये सराव सत्रादरम्यान बुमराहला पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यानंतर बीसीसीआय वैद्यकीय पथकाच्या सांगण्यावरून त्याला पहिल्या टी-20 सामन्यातून वगळण्यात आले.