टीम इंडियात महाराष्ट्राचा चौकार? श्रीलंकन दौऱयासाठी चार क्रिकेटपटूंची निवड होण्याची शक्यता

हिंदुस्थानचा क्रिकेट संघ जुलै महिन्यात श्रीलंकन दौऱयावर जाणार असून दोन देशांमध्ये तीन टी-20 व तीन वन डे मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. याच कालावधीत हिंदुस्थानचा सीनियर क्रिकेट संघ इंग्लंड दौऱयावर कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱयासाठी निवड न झालेल्या क्रिकेटपटूंची श्रीलंकन दौऱयात निवड केली जाणार आहे. टीम इंडियाच्या या संघात मुंबईसह महाराष्ट्राच्या चार खेळाडूंचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे व ऋतुराज गायकवाड या क्रिकेटपटूंना संधी मिळेल अशाप्रकारचे वृत्त मीडियामधून समोर आले आहे.

सहा फलंदाज अन् दोन यष्टिरक्षक

हिंदुस्थानच्या या संघात सहा फलंदाज व दोन यष्टिरक्षक असण्याची शक्यता आहे. फलंदाजांच्या यादीत शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे यांचा समावेश असेल. तसेच संजू सॅमसन व इशान किशन यांच्या खांद्यावर यष्टिरक्षणाची जबाबदारी असेल.

हिंदुस्थानचा संभाव्य संघ खालीलप्रमाणे

फलंदाज – शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे. अष्टपैलू – राहुल तेवतीया, हर्षल पटेल, कृणाल पांडय़ा, हार्दिक पांडय़ा, शिवम दुबे, विजय शंकर. यष्टिरक्षक – संजू सॅमसन, इशान किशन. फिरकीपटू – कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर. वेगवान गोलंदाज -भुवनेश्वरकुमार, चेतन साकरीया, दीपक चहर, नवदीप सैनी, खलील अहमद, जयदेव उनाडकट.

लंकेतही कोरोना वाढतोय; दौऱयावर संकट

हिंदुस्थानप्रमाणे आता श्रीलंकेतही कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. मंगळवारी 2568 कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता हिंदुस्थानच्या श्रीलंकन दौऱयावरही संकट ओढवले आहे. याप्रसंगी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या प्रशासकीय समितीचे चेअरमन अर्जुन डिसिल्व्हा म्हणाले, एकाच स्टेडियममध्ये मालिका खेळवण्याचा आमचा विचार आहे; पण येथील पुढील कोरोनाची परिस्थिती कशी असेल यावरही हा दौरा अवलंबून असणार आहे. पण ही मालिका खेळवण्यात आल्यास स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार नाही.

भुवी, पांडय़ा बंधूंवर मदार

हिंदुस्थानच्या या संघाची मदार शिखर धवन या अनुभवी खेळाडूसह हार्दिक व कृणाल या पांडय़ा बंधू व भुवनेश्वरकुमार या वेगवान गोलंदाजांवर असणार आहे. या संघात पांडय़ा बंधूंसह हर्षल पटेल, शिवम दुबे, विजय शंकर हे अष्टपैलू खेळाडू असतील. तसेच कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, राहुल चहर व वरुण चक्रवर्ती ही चौकडी फिरकीची जबाबदारी सांभाळेल. चेतन साकरीया, दीपक चहर, नवदीप सैनी, खलील अहमद, जयदेव उनाडकट यांच्यापैकी कोणत्या वेगवान गोलंदाजांना संधी मिळेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या