टीम इंडिया ‘नंबर वन’; कधीही उसळी घेईल

40

ऑस्ट्रेलियन सलामीवीर वॉर्नरचा संघ सहकाऱ्यांना इशारा

बंगळुरू – कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघ जगातला ‘नंबर वन’ कसोटी संघ आहे. हिंदुस्थानी क्रिकेटपटू एका पराभवाने खचून जाणारे नाहीत. ते कधीही उसळी घेऊन प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करू शकतात याचे भान ठेवा, बंगळुरू कसोटीत मुळीच बेसावध राहू नका, असा गंभीर इशारा ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने आपल्या संघ सहकाऱ्यांना दिला आहे.

‘टीम इंडिया’ने पुणे कसोटीत ३३३ धावांचा पराभव पत्करला असला तरी एका पराभवाने कच खाणाऱ्यांपैकी हिंदुस्थानी क्रिकेटपटू नाहीत. त्यामुळे बंगळुरूत विराट सेना आपल्याला जोरदार लढत देण्याच्या तयारीनेच मैदानात उतरेल यात शंका नाही. ‘टीम इंडिया’कडे एकाहून एक सरस अशा महान फलंदाज व गोलंदाजांची फळी आहे. अशा स्थितीत एका पराभवाने हिंदुस्थानी संघाला कमी लेखणे धोकादायक ठरेल, असे स्पष्ट मत वॉर्नरने मांडले.

‘हिंदुस्थानला त्यांच्या घरात पराभूत करणे हे अग्नीदिव्यच असते. त्यामुळे पुण्याच्या पराभवाने यजमानांना कमी लेखण्याची चूक आम्ही मुळीच करणार नाही.’
– डेव्हिड वॉर्नर

स्टार्कच आमचे प्रमुख अस्त्र असेल – मिचेल मार्श
हिंदुस्थानी खेळपट्ट्यांवर आमचे फिरकी गोलंदाज यशस्वी ठरणार असले तरी या दौऱ्यात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच आमचे प्रमुख अस्त्र असेल असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याने केले. पुण्यासारखी खेळपट्टी अन्य तीन कसोटींत मिळेलच असे नाही. त्यामुळे ‘रिव्हर्स स्वींग’मध्ये मास्टरी असणारा स्टार्क आमचा प्रमुख गोलंदाज असेल. जोडीला दुसरा वेगवान गोलंदाज जोश हेरुलवूड आहेच, असेही मार्श याने सांगितले.

पुण्यात त्यांची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण ‘टॉप’च होते
पुण्यातील पहिल्या कसोटीत हिंदुस्थानी संघाचे गोलंदाजीतील बदल, त्यांचे क्षेत्ररक्षण जगातील ‘नंबर वन’ संघाला शोभणारेच होते, पण दुर्दैवाने यजमानांची फलंदाजी ‘क्लीक’ झाली नाही त्यामुळेच आम्हाला यजमान टीम इंडियावर मोठा विजय मिळवता आला, असे वॉर्नरने मान्य केले. तो म्हणाला, आमचा ऑस्ट्रेलियन संघ परिस्थितीनुसार खेळला आणि आमचा खेळ विजयाला अनुकूल ठरला ही आनंदाची बाब आहे, पण घरच्या मैदानावर ‘टीम इंडिया’ जखमी वाघासारखी उसळी घेण्यात माहीर आहे, याचे भान आम्हाला ठेवावेच लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या