विराट-अजिंक्यचा ‘रन’संकल्प, दक्षिण अफ्रिकेवर ६ गडी राखत मात

15

सामना ऑनलाईन, दरबान

उशिरा सूर गवसलेल्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने कसोटी मालिकेतील अखेरचा सामना जिंकल्यानंतर आता पहिला एकदिवसीय सामनाही जिंकला आहे. विराट कोहलीच्या ११२ धावा आणि मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या ७९ धावांच्या जोरावर हिंदुस्थानी संघाने दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा एकदिवसीय सामना सहजपणे जिंकला. विराट कोहलीचं हे ३३ वं शतक असून अजिंक्य रहाणेची हे सलग पाचवं अर्थशतक आहे.

दक्षिण अफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकात त्यांनी ८ गड्यांच्या मोबदल्यात २६९ धावा करत हिंदुस्थानसमोर विजयासाठी २७० धावांचं लक्ष ठेवलं होतं. हिंदुस्थानी संघाने ४५.३ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण करत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला विजय मिळवला. या दौऱ्यात सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माला एकदिवसीय सामन्यातही दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांनी फार काळ खेळपट्टीवर टिकू दिला नाही. २० धावांवर असताना रोहित बाद झाला, त्यापाठोपाठ ३५ धावा करून शिखर धवनही पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी डाव नुसताच सावरला नाही तर वेगाने धावा गोळा करायलाही सुरुवात केली. ११९ चेंडूत कोहलीने १० चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले, तो बाद झाला तेव्हा हिंदुस्थानचा संघ सुरक्षित स्थितीत पोहोचला होता. कोहली आणि रहाणे बाद झाल्यानंतर धोनी आणि हार्दिक पांड्या यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं.

दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला खरा मात्र त्यांची सुरुवात अत्यंत धीमी आणि खराब झाली. पहिल्या ५ षटकात यजमानांना फक्त १८ धावा गोळा करता आल्या होत्या. त्यांचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस मैदानात उतरल्यानंतर मात्र चित्र बदललं कारण त्याने वेगाने धावा करायला सुरुवात केली. ११२ चेंडूत त्याने १२० धावा फटकावल्या. मात्र त्याला सहाव्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरलेल्या ख्रिस मिलर वगळता इतर एकाही फलंदाजाची साथ लाभली नाही. या सामन्यात कुलदीप यादवने ३, यजुवेंद्र चहलने २ तर जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक बळी टीपले. दरबानचा सामना जिंकल्यानंतर हिंदुस्थानी संघाचं मनोबल उचावलं असून ४ फेब्रुवारीला सेंच्युरिअन इथे होणारा पुढचा सामनाही जिंकायच्या उद्देशाने हा संघ मैदानात उतरलेला बघायला मिळेल

आपली प्रतिक्रिया द्या