‘विश्वविजया’ची 36 वर्ष, ऐतिहासिक लॉर्डस मैदानावरील सामना आजही स्मरणात

सामना ऑनलाईन । मुंबई

आजपासून बरोबर 36 वर्षापूर्वी टीम इंडिया विश्वविजेता झाला होता. कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये बलाढ्य वेस्ट इंडीजचा पराभव करत पहिल्यांदा वर्ल्डकप उंचावला होता. 1975 आणि 1979 मध्ये पहिल्या फेरीचा अडथळाही पार न करू शकलेला हिंदुस्थानचा संघ 1983 च्या वर्ल्डकपमध्ये जायंट किलर ठरला. इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात दिग्गज वेस्ट इंडीजला पराभवाचा धक्का दिला आणि तिसऱ्या विश्वचषकावर नाव कोरले. हिंदुस्थानच्या विजयामुळे सलग तिसरा वर्ल्डकप जिंकून ‘हॅटट्रिक’ करण्याची वेस्ट इंडीजची स्वप्न उद्ध्वस्त झाली.

25 जून 1983 रोजी अंतिम सामना हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीजमध्ये रंगला. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. वेस्ट इंडीजच्या धारधार गोलंदाजीसमोर हिंदुस्थानचा संघ अवघ्या 183 धावांमध्ये बाद झाला होता. हिंदुस्थानने दिलेले माफक आव्हान वेस्ट इंडीजची तगडी फलंदाजी पार करून तिसरा विश्वचषक उंचावणार असा चाहत्यांचा अंदाज होता. परंतु क्रिकेट हा अनिश्विततेचा खेळ आहे हे लोक विसरले.

हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी धारधार गोलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या फलंदाजीला भगदाड पाडले आणि सामना हिंदुस्थानच्या बाजूने झुकवला. अमरनाथ आणि मदनलाल यांनी प्रत्येकी तीन बळी घेत हिंदुस्थानला पहिला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. हिंदुस्थानने अंतिम सामना 43 धावांनी जिंकत पहिल्या वर्ल्डकपवर नाव कोरले. अंतिम सामन्यात रिचर्डस् यांनी टोलवलेला चेंडू कपिलदेवने 18-20 यार्ड पाठीमागे पठत जाऊन झेलला होता आणि हा झेल कायमच क्रीडाप्रेमिंच्या लक्षात राहिला.

पाहा थरारक सामना