खायला अन्न नाही, पाणीही संपत आलं; गुजरातच्या पुरात बुडता बुडता वाचली टीम इंडियाची खेळाडू; 48 तासानंतर सुटका

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. इमारती, रस्ते, वाहने बहुडाली असून पुरात आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 41 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या पुराचा फटका टीम इंडियाची महिला फिरकीपटू राधा यादव हिलाही बसला आहे. जवळपास 48 तास राधा पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. अखेर बुधवारी सायंकाळी राधाची सुखरुप सुटका करण्यात आली.

राधा यादव ही बडोद्यातील अरण्य अपार्टमेंट्समध्ये राहते. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा या अपार्टमेंटलाही बसला होता. या पुरामध्ये काहीही न खाता पिता राधा जवळपास 48 तास अडकून पडली होती. याची माहिती मिळताच बचाव पथकाने तिथे धाव घेत तिला तातडीने तिथून बाहेर काढले आणि तिचा जीव वाचवला. यानंतर तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्यावर ओढावलेला प्रसंग कथन केला.

‘माझ्यासाही हा एक भयानक अनुभव होता. आम्ही पुराच्या पाण्यामध्ये अडकलो होतो. पहिल्यांदाच मी घराभोवती पुराचे पाणी पाहिले. अग्निशमन दलाने तातडीने पावले उचलत मला आणि माझ्या कुटुंबीयांना सुखरुप बाहेर काढले, याबद्दल मी त्यांची सदैव ऋणी राहीन’, असे राधा यादव हिने म्हटले.

तिने पुढे सांगितले की, ’25 ऑगस्ट रोजी मी मुंबईहून बडोद्याला आली होती. तेव्हापासून पावसाचा जोर वाढलेला होता. हळूहळू घराला पुराचा वेढा बसू लागला. काही काळ हे पाणी राहील आणि नंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल असे वाटले होते. मात्र पाणी ओसरण्याऐवजी आमच्या अपार्टमेंटभोवची ते वाढतच गेले आणि आम्ही पुरामध्ये अडकलो. आमच्याकडे खाण्यासाठी अन्नही उरले नव्हते. व्हीएमसी आणि अग्निशमन दलाने आम्हाला खाद्यपदार्थ दिले.’

दरम्यान, 24 वर्षीय राधा यादव टीम इंडियाची स्टार फिरकीपटू आहे. तिने 80 टी20 आणि 4 वन डे लढतीत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. टी20 मध्ये तिच्या नावावर 90 विकेट्सची नोंद आहे. डब्ल्यूपीएलमध्ये ती दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळते. तसेच ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅश स्पर्धेत ती सिडनी सिक्सर्स वुमन संघाकडूनही खेळली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)