
एका बड्या कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा ऑनलाईन लैंगिक त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबईमध्ये भाड्याने घर शोधत असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागलेला असताना 27 वर्षांची ही महिला गुजरातला तिच्या मूळ घरी राहायला गेली होती. लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा हळूहळू बंद करायला सुरुवात केली आहे. यामुळे ही महिला मुंबईमध्ये पुन्हा राहायला येण्याची तयारी करत होती. यासाठी तिने मुंबईत भाड्याने घर शोधायला सुरुवात केली होती.
ही महिला मालाड-गोरेगांव भागात घर शोधत होती. घर शोधणं सोपं जावं यासाठी तिने फेसबुकवर अकाऊंट सुरू केलं होतं. फेसबुकवर भाड्याने दिल्या जाणाऱ्या घरांची माहिती देणारे काही ग्रुप आहेत. या ग्रुपमध्ये सामील होता यावं या उद्देशाने या महिलेने फेसबुकवर खातं उघडलं होतं. अक्षय सिंग असं नाव असलेल्या एका व्यक्तीने या महिलेला फेसबुकवर संपर्क साधला होता. आपल्याकडे भाड्याने देण्यासाठी एक घर असल्याचं अक्षयने या महिलेला सांगितलं होतं. थोडंफार संभाषण झाल्यानंतर अक्षयने या महिलेकडे फोननंबर मागितला होता.
थोडावेळ सभ्यपणे बोलल्यानंतर सिंगने या महिलेला ‘तुला भाडं भरण्याची गरज नाही, मी तुझा सगळा खर्च उचलेन असं सांगत तिच्याकडे याबदल्यात सेक्सची मागणी करायला सुरुवात केली. माझा फोन ब्लॉक केलास तर तुझी बदनामी करेन अशी धमकीही या अक्षयने महिलेला दिली. खोटं प्रोफाईल तयार करून त्यावर तुला कॉलगर्ल दाखवत तुझा नंबर शेअर करेन अशी धमकी अक्षयने दिली होती. यानंतर या महिलेने अक्षयला उत्तरं देणं बंद करून टाकलं. त्यानंतरही अक्षय तिला लागोपाठ मेसेज टाकत होता. यानंतर या महिलेने या संभाषणाचे स्क्रीनशॉट घेत मुंबई पोलिसांना एक ट्विट केलं होतं. मुंबई पोलिसांनी या महिलेला गुजरात सायबर क्राईमकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. हा सगळा प्रकार अत्यंत धक्कादायक होता अशी प्रतिक्रिया या महिलेने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे.