विवाहित प्रेयसीला भेटायला खिडकीतून गेला, नवव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

97
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी खिडकीच्या मार्गाचा वापर करणाऱ्या एका तरुणाचा नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. मुंबईतील आग्रीपाडा येथे ही घटना घडली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हा 19 वर्षांचा तरुण मूळचा बिहार येथील असून दोन वर्षांपूर्वी आपल्या मामासोबत बिहारमधून आग्रीपाडा येथील 15 मजली इमारतीत राहायला आला होता. त्याचे त्याच्याच इमारतीत नवव्या मजल्यावर राहणाऱ्या एका 24 वर्षीय विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध होते. तो वारंवार तिच्या घरी जात असल्याने त्याच्या मामांना त्याच्या या संबंधांविषयी कुणकुण लागली होती. त्यामुळे त्याने तिला भेटण्याचा एक धोकादायक मार्ग शोधून काढला होता. तो तिच्या घरी दारामार्गे न जाता खिडकीतून ये जा करत असे. त्यासाठी तो त्याच्या घरातून पाईप चढून तिच्या घराच्या खिडकीत जात असे.

बुधवारी रात्रीही त्याने तशाच प्रकारे तिच्या घरी जायचा प्रयत्न केला. पण, तिच्या खिडकीत आल्यानंतर तिचा पती घरातच असल्याचं त्याला दिसून आलं. त्यामुळे त्याने परत जायचा निर्णय घेतला. मात्र, गेले काही दिवस पडलेल्या सततच्या पावसाने पाईप निसरडे झाले होते. त्यामुळे आपल्या घरी परत जात असताना निसरड्या पाईपावरून घसरून तो थेट नवव्या मजल्यावरून खाली कोसळला. रात्री 2.30च्या सुमाराला सोसायटीत पाणी चढवण्यासाठी आलेल्या वॉचमनला तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याने त्वरित हालचाल करून इमारतीतील रहिवासी आणि पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्युची नोंद केली असून त्याच्या प्रेयसीचीही चौकशी सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या