मुलींच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्फ्यु लावा- मेनका गांधी

61

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मुलामुलींच्या शरीरात १६-१७व्या वर्षी हार्मोन्स बदलत असतात. त्यामुळे या वयात त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही बंधनं घातली जावीत, असं धक्कादायक वक्तव्य केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी केलं आहे. एरवी लैंगिक समानता आणि स्त्रियांचे हक्क यासाठी आग्रही असणाऱ्या मेनका यांच्या या विधानामुळे अनेकांना धक्का बसला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली.

महाविद्यालयात शिकणाऱ्या किंवा हॉस्टेलला राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी फक्त सुरक्षारक्षक नेमून उपयोग नाही. त्यासाठी मुलींवर बंधने घातला येतील का?,याचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी संध्याकाळी सहानंतर महाविद्यालय किंवा हॉस्टेल परिसरात फिरायला मनाई करायला हवी. वयाच्या १६-१७व्या वर्षी हार्मोनच्या बदलांमुळे तरुण-तरुणी भावनिक आवेगांची शिकार होतात. अशा आवेगांना वेळीच थांबवण्यासाठी काही बंधने घातली गेली पाहिजेत. कारण, मुलींची सुरक्षितता महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी वाचनालयात जाऊन अभ्यास करायचा असेल तर, मुलांना आणि मुलींना वेगवेगळं बसवण्यात यावं. अथवा दोन रात्री मुलींसाठी आणि दोन रात्र मुलांसाठी वाचनालयाची वेळ राखून ठेवली पाहिजे, असं मेनका गांधी यावेळी म्हणाल्या.

मेनका गांधींनी याआधीही गर्भलिंग चाचणी अधिकृत करावी, असं विधान केले होतं. चाचणी अधिकृत केल्यामुळे गर्भात वाढणाऱ्या बाळाची नोंद ठेवली जाईल आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखली जाईल, असं गांधी यांनी म्हटलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या