तेजाज्ञाची ‘दागिना साडी’

7623

>> संजीवनी धुरी-जाधव, [email protected]

सण-उत्सव दाराशी येऊन उभे राहिलेत. त्यांच्या स्वागतासाठी तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावेने दागिनेजडीत साडय़ा आणल्या आहेत…

कुठलाही ट्रेण्ड फॉलो न करता आपल्या भन्नाट कल्पकतेतून सतत कपडय़ांमध्ये नावीन्यता आणणाऱया ‘तेजाज्ञा’ने आता आणखी एक नवीन कलेक्शन आणले आहे. नथ दुपट्टा कलेक्शन, डेनिम कलेक्शन, सिल्व्हर ज्वेलरी कलेक्शननंतर आता साडय़ांवर पारंपरिक दागिने असलेले अनोखे ‘दागिना कलेक्शन’ तेजाज्ञाने आणले आहे. याविषयी जाणून घेऊया.

अभिनेत्री आणि दागिना कलेक्शनबाबत बोलताना तेजस्विनी पंडीत सांगते की, पुतळी हार, कोल्हापुरी साज, तन्मणी हे आपले पारंपरिक दागिने आहेत; पण प्रत्येकालाच सोनं खरेदी करायला जमतं असं नाही.ते दागिने हल्ली एखाददुसऱया कार्यक्रमासाठी घालतो आणि तिजोरीत ठेवून देतो. पण ‘दागिना कलेक्शन’ हे असे कलेक्शन आहे की ज्याच्यामध्ये साडीच्या गळय़ाजवळ आणि ब्लाऊजपाशी आम्ही या सगळय़ा तिन्ही दागिन्यांची डिझाईन करून दिलेली आहे. त्यामुळे अगदी खरोखर दागिने घातल्याचा फिल येईल एवढे नक्की. पुढे ती या संकल्पनेविषयी बोलते की, साडीवर दागिना ही संकल्पना आमच्यासाठी जुनी नव्हती; कारण गेल्या वर्षी काही नववधूला साडीवर झुमके करून दिले होते. त्यामुळे याबाबत मी, अभिज्ञा, सुनीताताई त्यावर आणखी विचारविनिमय करून पदरावर काहीतरी कल्पक करायचे असे ठरले. पण माझं ठाम मत होतं की, हल्ली पदराचा जमाना राहिला नाही आहे. हल्ली सेल्फीचा जमाना आहे. या जमान्यात चेहरा ते कंबरेपर्यंतचा भाग हा दर्शनीय असतो. मग पदरावरती सगळं दिलं आणि पुढे प्लेन दिलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून ंमग आपण सगळं फ्रंटवर गळय़ाजवळ आणूया. अशारीतीने दागिना कलेक्शनची कल्पना सुचली. आता जगात काय चाललंय हे लक्षात घेऊन आम्ही हे कलेक्शन सादर केल्याचे तेजस्विनी सांगते.

पुतळी हार, कोल्हापुरी साज, तन्मणी याचे ऍक्च्युअल दागिना करणे हे फार मेहनतीचे आणि आव्हानात्मक काम होते. आमचे जे टेलर आहेत ते अमराठी आहेत. त्यांना माहीत नव्हते की हे काय असतं, याला साज म्हणतात, तन्मणी म्हणतात की पुतळी हार म्हणतात. त्यामुळे त्यांना खरे दागिने दाखवायला लागले. त्याचे फोटो त्यांना द्यावे लागले. त्यासाठी ज्वेलर्सकडून दागिने मागवावे लागले.

दागिना साडीला प्रचंड प्रतिसाद
‘दागिना साडी’च्या आम्ही बारा साडय़ा केल्या होत्या आणि बाराच्या बारा साडय़ा पुण्याच्या एक्झिबिशनमध्ये विकल्या गेल्या याच्यापेक्षा काय वेगळा आनंद असेल! लोकांना एखादी कलाकृती आवडली आणि ती लगेच विकली जाते यावर आमचा विश्वास आहे. दोन दिवसांत बारा साडय़ा लगेच विकल्या जाणे मोठी गोष्ट आहे. आम्हाला आमच्या कामाची मिळालेली पोचपावती आहे.

लवकरच वधूसंग्रह आणतोय
पुढे काय, हा प्रश्न आम्हाला नेहमीच सतावत असतो. पण आम्ही फॅशन किंवा ट्रेण्डस्मध्ये अडकून पडत नाही. आम्ही आमची क्रिएटिव्हिटी आमच्या कपडय़ांमध्ये जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करतो. लोकांना नावीन्यता आवडते. पुढे काय करायचे त्याचा नेमका विचार केलेला नाही, पण खूप मोठं वधूसंग्रह आणतोय.

नवीन पिढी नावीन्यता जपणारी
‘तेजाज्ञा’ या ब्रॅण्डबाबत आधी अभिनेत्री म्हणून लोकांनी प्रेम केले. आता डिझायनर म्हणून प्रेम करतायत. लोकांना अभिनयाबरोबर डिझाईन्सही तेवढय़ाच आवडतायत. मराठी लोकांना पारंपरिकता जपणाऱया गोष्टी आवडतात. त्यामुळे दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतोय. नवीन पिढी नावीन्यतेला जपणारी असते, त्यांना युनिक दिसायचे असते. त्यांना जिथे वेगळे दिसेल तिथे ते आकर्षित होतात. म्हणून ‘तेजाज्ञा’कडे नवी पिढी जास्त आकर्षित होते.

अभिनय करीअर, तर डिझाईन पॅशन आहे
अभिनय हे आमचं बेसिक करीअर आहे आणि डिझाईन हे आमचं पॅशन आहे. दोन्ही गोष्टींमध्ये सांगड घालावी लागते. जेव्हा तुम्ही एखादा ब्रॅण्ड उघडता, व्यवयास करण्याचा प्रयत्न करता त्या वेळी खूप वेळ, पैसा याची गुंतवणूक करावी लागते. आमची करीअरमधून मिळालेली सारी मिळकत आम्ही तेजाज्ञासाठी वापरतो. त्यामुळे आमचे ते पैसे हार्ड अर्न मनी आहे. एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर वेळ हा काढावाच लागतो. आम्ही आमचे करीअर सांभाळून करतो. दोघींना एकत्र वेळ देता येणं शक्य नसल्यास मी नसताना अभिज्ञा सांभाळते, ती नसताना मी बघते. दोघीजणी असल्यामुळे एकीला एक बरे पडते.

आपली प्रतिक्रिया द्या