बिहारमध्येही राजदची सत्ता स्थापनेसाठी खलबते, राज्यपालांना दिले पत्र

44

सामना ऑनलाईन । पाटणा

भाजपच्या कर्नाटकमधील सत्ता स्थापनेच्या नाट्याचे पडसाद आता देशातील इतर राज्यांमध्येही दिसू लागेल आहेत. बहुमत नसताना सर्वाधिक जागा मिळाल्या म्हणून कर्नाटकच्या राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिल्याने आता त्याच धर्तीवर आम्हालाही सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावे अशी मागणी बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे केली आहे. तेजस्वी यादव व तेजप्रताप यादव यांच्यासह काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षांच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन राजदला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण द्यावे असे पत्र दिले आहे.

‘राजद, काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाच्या युतीचे १११ आमदार आमच्यासोबत असून आम्हाला जर संधी दिली तर आम्ही विधानसभेत आमचे बहुमत सिद्ध करू. जदयूतील काही नाराज आमदार देखील आमच्या संपर्कात आहेत. तसेच आम्हाला खात्री आहे की आमच्यातील एकही आमदार फुटून नितीश कुमारांसोबत जाणार नाही’ असे तेजस्वी यादवने विधानभवनाबाहेर पत्रकारांना सांगितले.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला ८० जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस २७, जदयू – ७१, भाजप, ५३, लोकजनशक्ती पार्टी २, आर.एल.एस.पी २, जीतनराम मांझी यांच्या पक्ष एका जागेवर विजयी झाला होता. त्यानंतर राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस व जदयूने सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी नितीश कुमार मुख्यमंत्री तर लालू पुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त झाले होते. मात्र त्यानंतर काही महिन्यातच राजद व जदयूचा काडीमोड झाला. त्यानंतर लगेचच जदयूने भाजपशी युती करून सत्ता स्थापन केली. त्यामुळे तेजस्वी यादवला उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते.

दरम्यान, कर्नाटकात बहुमत नसतानाही केवळ मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण राज्यपाल वजुभाई वाला यांनी दिल्यानंतर बिहारमध्ये राजद व गोवा, त्रिपुरा व मणिपूरमध्ये काँग्रेसने देखील याच धर्तीवर सत्ता स्थापनेचे निमंत्रण देण्याची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या