
बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे बिहारमध्ये अत्यंत खालच्या पातळीवर राजकारण करत आहेत.ते ‘चीफ मिनिस्टर’ नाही तर ‘चीप मिनिस्टर’ आहेत, अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे नेते तेजस्वी यादव यांनी भाजप सरकार आणि मुख्यमंत्रांवर टीका केली.
बिहारमध्ये सध्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्याकडे असलेला सरकारी बंगला दुसऱया मंत्र्याला दिल्याबद्दल आणि आई-वडिलांच्या सुरक्षेत कपात केल्याबद्दल तेजस्वी यांनी बिहार सरकारला चांगलेच धारेवर धरले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार हे भ्रष्ट अधिकारी आणि गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. आरजेडी नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली जात असून जे घाबरतात त्यांनी सुरक्षा ठेवली आहे. जनता आमच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि इतर एनडीए नेते ज्या काही मुद्दय़ांवर चर्चा करत आहेत त्याचा जनतेशी कोणताही संबंध नाही, असेही ते म्हणाले.

























































