भाजप नेत्याचा पंख्याला लटकलेला मृतदेह सापडल्याने खळबळ

तेलंगाणा भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य असलेल्या ज्ञानेंद्र प्रसाद याचा मृतदेह सापडला आहे. मियापूर भागात असलेल्या ऑल्विन कॉलनीत ते वास्तव्यास होते. प्रसाद यांचा मृतदेह त्यांच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. मात्र ही हत्या होती का आत्महत्या याचा पोलीस शोध घेत आहेत. प्रसाद यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिली नाहीये.

प्रसाद यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता आणि त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. प्रसाद यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला आपण आपल्या खोलीत जात असून मला डिस्टर्ब करू नका असं सांगितलं होतं. त्यांचा पीए त्यांना नाश्ता हवाय का हे विचारण्यासाठी गेला असता त्याला दरवाजा बंद दिसला. आतून काहीच आवाज येत नसल्याने पीएने खिडकीची काच फोडून त्यांच्या खोलीत प्रवेश केला, यावेळी त्याला प्रसाद हे छताला लटकावलेल्या अवस्थेत दिसून आले होते.