लग्नासाठी विरोध केल्याने प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, शेवटी रुग्णालयातच झाला निकाह

27

सामना ऑनलाईन । हैदराबाद 

तेलंगणातल्या विकाराबादमध्ये एका लग्नाची गोष्ट ऐकली तर तुम्ही देखील चाट पडाल. रेश्मा (19) आणि नवाज (21) या दोघांच्या लग्नाचा सोहळा चक्क रुग्णालयात पार पडला. लग्नासाठी घरच्यांकडून विरोध होत असल्याने दोघांनीही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्यांना उपचारासाठी एकाच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे कसाबसा त्यांचा जीव वाचला. त्यामुळे पुन्हा असा टोकाचा निर्णय घेऊ नये म्हणून अखेर कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आणि रुग्णालयातच त्यांचा विवाहसोहळा पार पडला.

रेश्मा आणि नवाजचे दोन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. लग्नाबद्दल त्यांनी घरच्यांना विचारले तेव्हा रेश्माच्या नातेवाईकांनी त्याला विरोध केला. कारण रेश्माच्या मोठ्या बहिणीचे लग्न नवाजच्या मोठ्या भावाबरोबर झाले असून तेव्हापासून दोन्ही कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दुसरी मुलगी देखील त्याच घरात देण्यासाठी रेश्माच्या घरच्यांनी विरोध केला. घरचे ऐकत नसल्याचे पाहून रेश्माने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तर रेश्माच्या आत्महत्येची बातमी कळताच नवाजने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी योगायोगाने दोघांनाही एकाच रुग्णालयात दाखल केले. शेवटी दोघांचेही एकमेकांवरील प्रेम बघून त्यांच्या लग्नाला असलेला विरोध मावळला आणि रुग्णालयातच दोघांचेही लग्न लावण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या