
चोरी करताना चोर वेगवेगळे हातखंडे वापरत असतात. पकडले जाऊ नये म्हणून चोर भन्नाट शक्कलही लढवतात. काही चोर असं डोकं लावतात की पोलीसही हैराण होतात. अशाच एका चोराही सध्या सोशल मीडियावर चर्चा असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून पोलीसही हैराण झाले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण स्वत:च्या बायकोचे कपडे आणि लांबसडक केसांचा वीग घालून दुकानामध्ये चोरी करतो. हा सर्व प्रकार तेलंगणामधील राजन्ना सिस्रिया जिल्ह्यातील येल्लारेड्डीपेट मंडल मुख्यालयात घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणाचे नाव रामिंदला सुधीर आहे. सुधीरला लक्झरी जीवनाची सवय लागली असून पैशांची गरज भागवण्यासाठी त्याने चोरी करण्याचे ठरवले होते.
सुधीर राहतो त्याच इमारतीमध्ये त्याने चोरी करण्याचा प्लॅन आखला. या इमारतीमध्ये असणाऱ्या प्रिंटरच्या दुकानात त्याने चोरी करण्याचे ठरवले. रात्री पत्नीचे कपडे आणि वीग घालून तो दुकानाच्या मागच्या दारातून आत घुसला आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेले 3500 रुपये घेऊन त्याने पोबारा केला. मात्र हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दुकानदाराने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
View this post on Instagram
पोलिसांनी चोराचा शोध लावण्यासाठी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता त्यांनाही धक्का बसला. तरुणीच्या वेशात आलेल्या तरुणाने हा गुन्हा केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी इमारतीतील सर्वांच्या हालचालीवर नजर ठेवली. सुधीरच्या हालचालीवर संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीमध्ये सुधीरने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रमाकांत यांनी दिली.